01

विवेकाचा आवाज बुलंद ठेवूया!

महाराष्ट्राला अंधश्रद्धेविरुद्ध वास्तववादी आणि सुजाण पवित्रा घेणाऱ्या विवेकवादी समाजसुधारकांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. भारतीय घटनेमधेही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य मानलं आहे आणि शिक्षणामधून ह्या मूल्याची जोपासना व्हावी असंही त्यामधे अभिप्रेत आहे.

विज्ञान हेच असं एकमेव अस्त्र आहे जे आपल्या इथल्याभूक आणि दारिद्रय, अस्वच्छता आणि निरक्षरता, अंधश्रद्धा आणि जुनाट रूढीपरंपरा , वाया जाणारी प्रचंड साधनसंपत्ती आणि या समृद्ध देशातील उपासमार अशा सर्व समस्यांवर तोडगा काढू शकेल. आजच्या जगामधे विज्ञानाकडे दुर्लक्ष करणं कोणाला शक्य होईल? प्रत्येक गोष्टीमधे विज्ञानाची मदत आपल्याला घ्यावी लागते. यापुढे विज्ञानाला आणि विज्ञानाच्या मित्रांनाच केवळ भविष्य आहे.

जवाहरलाल नेहरू

देशाचे पहिले द्रष्टे पंतप्रधान, नेहरू यांच्या या संस्मरणीय उक्तीला पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला असला तरी आजही ह्या सात लाख खेडी आणि पाडे असलेल्या समृद्ध देशामधे हरितक्रान्तीमुळे प्रत्यक्ष भूकबळी नसले तरी, ज्यांच्या गळ्याभोवती अंधश्रद्धा आणि जीवघेण्या परंपरा-रूढींचे दोरखंड आवळलेले आहेत अशाच लोकांची वस्ती जास्त आहे. ही दोरखंडे तोडून टाकल्याशिवाय नेहरूजींचं विज्ञानाशी मैत्री करण्याचं स्वप्न साकार होणार नाही तर विज्ञान केवळ काही अभिजनांच्या हातातलं खेळणं आणि शोषणाचं साधन बनून राहील.

समाजामधे  वैज्ञानिक चित्तवृत्ती जोपासणे हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रचारापेक्षा बरंच काही जास्त आहे: वैज्ञानिक चित्तवृत्ती (सायंटिफिक टेंपर) म्हणजे केवळ ज्ञानवृद्धीसाठी आवशक असलेली माहिती आणि तथ्ये जाणणं नव्हे qकवा विवेक बुद्धी वाढवणारा विवेकवादही नव्हे. त्यामधे बरंच आणखी काही आहे. वैज्ञानिक चित्तवृत्ती हा एक मनाचा कल आहे ज्याच्यामुळे व्यक्तीचा एक विशिष्ट दृष्टिकोन आणि वागणुकीची पद्धत निश्चित होते. असा कल एखाद्या वंश-धर्म-देशापुरता मर्यादित नसून तो वैश्विक आहे. हा कल एक प्रभावी नैतिक मूल्य म्हणून आपल्या समाजाच्या सर्व थरांमधून झिरपला आणि मुरला पाहिजे; कारण आपण कसा विचार करतो, आपल्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक समस्यांना कसे सामोरे जातो या सर्व प्रक्रियांवर वैज्ञानिक चित्तवृत्तीचा मोठा प्रभाव पडतो.

वैज्ञानिक चित्तवृत्तीमधे मान्य केलेल्या  आधारविधानांपैकी महत्त्वाची विधाने अशी (प्रमिसेस) आहेत:

* विज्ञानाची पद्धती ही ज्ञानसंपादनाची एक विश्वासार्ह पद्धती आहे.

* या पद्धतीनुसार मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग करून अनेक मानवी समस्यांचं आकलन आणि उकल करता येते.

* वैज्ञानिक पद्धती माणसाच्या दैनंदिन जीवनामधे आणि नैतिकता ते राजकारण आणि अर्थकारण या सर्व क्षेत्रातील मानवी प्रयत्नांमधे पूर्णपणे उपयोगात आणली गेली पाहिजे तरच मनुष्य जातीचा निभाव लागेल; या भूतलावर मानव टिकू शकेल.

* वैज्ञानिक पद्धतीद्वारा संपादन केलेले ज्ञान हे त्या वेळेस माहीत असलेल्या सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जावू शकते हे सर्वांनी मान्य केले पाहिजे. ह्या ज्ञानाशी विसंगत असलेल्या ज्ञानाबाबत शंका उपस्थित केली पाहिजे तसेच तत्कालीन ज्ञानाचे पुन्हा पुन्हा परीक्षण करीत राहिले पाहिजे.

वैज्ञानिक पद्धती म्हणजे माहिती गोळा करून, त्यावर प्रक्रिया करणे; त्यातून मानवी स्वभाव, मानवाचे नैसर्गिक आणि सामाजिक वातावरण यांचं सुव्यवस्थित आकलन होईल असे अर्थपूर्ण आकृतीबंध (पॅटर्न्स) शोधणे. अशी ही पुनर्जननात्मक (रीजनरेटिव्ह) प्रक्रिया आहे. या अर्थाने संक्रामक (कम्यूनिकेबल) मानवी ज्ञानाचे सर्व पैलू  वैज्ञानिक पद्धतीच्या कवेत येतात आणि भौतिक विज्ञान, सामाजिक विज्ञान, उपयोजित विज्ञान अशा तऱ्हेचे विज्ञानाचे कृत्रिम कोष्ठीकरण (कंपार्टमेन्टलायझेशन) ज्ञानसंपादनाच्या आड येवू शकत नाही.

हे सर्व ध्यानात घेवून अंनिस वैज्ञानिक प्रवृत्तीचा विशेषतः ग्रामीण भागात प्रसार करण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवते. समाजाच्या सर्व स्तरांमधे वैज्ञानिक प्रवृत्ती रुजविणं आणि जोपासणं हे अंनिसचे स्वप्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *