अंधश्रद्धा

अंधश्रद्धा म्हणजे त्या श्रद्धा आणि आचरण ज्यांना कोणत्याही पुराव्याचा आधार असत नाही आणि जे समाजाने गाठलेल्या प्रबुद्धतेच्या पातळीशी विसंगत असतात.
अंधश्रद्धेची ही व्याख्या विश्वविद्यालयाच्या पदवीच्या पाठ्यपुस्तकातून घेतलेली आहे. परंतु ती दुर्लक्षित राहिलेली आहे. ती खूप विस्तृत असून तिच्यामधे सर्व मानवी उपक्रमांची आणि ज्ञानाची सर्व क्षेत्रे समाविष्ट झालेली आहेत. या विधानाचं विश्लेषणात्मक स्पष्टीकरण असं: एखाद्या समाजाच्या श्रद्धा आणि आचार त्या समाजाच्या तत्कालीन ज्ञान आणि अनुभवांशी जोपावेतो सुसंगत असतील (ते ज्ञान व अनुभव चुकीचे असणे अशक्य नाही हे इथे लक्षात घ्यायला हवे) तोपावेतो त्या श्रद्धांना अंधश्रद्धा म्हणता येणार नाही किवा त्या तशा वाटणार नाहीत. याचं कारण त्या समाजाची प्रबुद्धतेची किंवा आकलनाची पातळी आजच्या जगाच्या पातळी एवढी उंचावलेली नाही. प्रबुद्धतेची पातळी उंचावण्यासाठी तर्कशुद्ध विचार करायला हवा आणि त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारायला हवा. ही वैज्ञानिक वृत्ती जोपासायची म्हणजे निरीक्षण, चाचण्या आणि त्यातून सिद्ध करता येण्याजोगी तथ्ये यांच्यावर आधारलेल्या जगाचं ज्ञान असायला हवं. हे मिळविण्यासाठी सहिष्णू वृत्ती असायला हवी.
तर्कशुद्ध विचार आणि प्राप्त असलेल्या ज्ञान व अनुभवांचं अन्वेषण करण्यासाठी विज्ञानासारखं दुसरं कोणतंही साधन नाही. याचा अर्थ असा नाही की केवळ महान पंडितांनाच तर्कशुद्ध विचारांची मक्तेदारी बहाल केलेली आहे. तर्कशुद्ध विचार करणं ही मानवाची उपजत वृत्तीच आहे. पण या वृतीला शतकानुशतके दडपून टाकण्यात आलेलं आहे. ज्या कोणाला खरा तर्कशुद्ध विचार करण्याची कुवत असेल तो विवेकीच आहे.
अनेक डॉक्टर, इंजिनियर, नेते आणि वैज्ञानिक सुद्धा खूप शिकलेले आणि पुरेसे प्रबुद्ध असतात आणि तरीही त्यांचा अंधश्रद्धांवर भरवसा असतो. अद्यावत सुखसोयींनी समृद्ध असलेली त्यांची राहाणी आणि सुखवस्तु जीवन असूनही त्यांच्या आचारामधे विज्ञान उतरत नाही; त्यांच्या रोजच्या जगण्यामधे ते वैज्ञानिक वृत्ती टाळतात. ह्या सर्व विद्वान मंडळींवर अंधश्रद्धा बाळगण्याची कोणी जबरदस्ती करीत नाही. पण तरीही ते अंधश्रद्ध असतात कारण एकतर ते मुळात स्वार्थी असतात नाहीतर त्यांना कशाची तरी भीती वाटत असते किंवा ते ढोंगी असतात. त्यांच्या या असमर्थनीय वागणुकीमुळे सामान्य लोक बुचकळ्यात पडले तरीही त्यांचंच अनुकरण करतात. त्यांचं हे तर्कदुष्ट वर्तन त्यांच्या प्रबुद्धतेशी पूर्णपणे विसंगत आहे. म्हणून त्यांना अंधश्रद्धाळू म्हटलं पाहिजे. असे मान्यता पावलेले विद्वान अंधश्रद्ध असण्याचं दुसरं कारण असं की ते विद्वान असले तरी ते तर्कशुद्ध विचार करीत नाहीत किंवा  त्याबाबतीत सजग नसतात. विज्ञानाचा रोजच्या जीवनात वापर करणे त्यांना जमत नाही तसेच वैज्ञानिक वृत्तीने अंधश्रद्धांचं अन्वेषण करून त्यांच्या मागचं सत्य शोधून काढणंही त्यांना जमत नाही. खरं तर योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांना ते (वैज्ञानिक वृत्तीचा वापर करून अंधश्रद्धांचं अन्वेषण करणं) उमगतच नाही. अशा लोकांना मैत्रीपूर्वक सहानुभूतीने मार्गदर्शन करायला हवं.
साधारणतः अंधश्रद्धा धर्माचाच परिपाक समजल्या जातात. धर्म कधीच बदलत नाही; विज्ञान मात्र सतत बदल होण्याच्या प्रतीक्षेमधे असतं आणि ज्या बदलाची सत्यता सिद्ध होईल तो बदल स्वीकारतं. सर्व समाजसमूहांच्या स्थल-काल विशिष्ट पारंपरिक समजुती असतात; या समजुती सत्त्यतेच्या कसोटीवर खऱ्या उतरत नसतानाही त्यांना कवटाळून ठेवणं म्हणजेही अंधश्रद्धाच आहे. या अंधश्रद्धा अतिरेकीपणाला आणि मूलतत्त्ववादाला जन्म देतात. त्यामुळे मानवी प्रगती आणि विकासामधे अडथळा उत्पन्न होतो. त्याउलट सातत्याने बदल घडणं म्हणजे सतत उत्क्रांत होत राहाणं हा निसर्गाचा नियम आहे. जगण्यास जो सर्वात जास्त लायक तोच जगणार हा तर उत्क्रांतीचा कायदा आहे. गेल्या लाखो वर्षांच्या उत्क्रान्तीमधे जीवजातीच्या शारीरिक बळावर, ‘बळी तो कानपिळी या तत्त्वावर साध्या जीवजातींचं अस्तित्व अवलंबून होतं. पण मानवाचं पृथ्वितलावर आगमन झाल्यापासून हा नियम बदलला. इतर जीवजातींच्या मेंदूपेक्षा मानवाच्या मेंदूमधे काही खास अधिक आहे, आणि ते म्हणजे त्याची विचार करण्याची कुवत. ही कुवत नसती तर मानवजातीला निसर्गाच्या निर्दय परिस्थितीला टक्कर देत वाढत राहाण अशक्य होतं. आता माणसाच्या बद्धीची, विचारशक्तीची ताकद हाच तग धरून राहण्याचा नवा कायदा बनला. इथेच तर्कशुद्ध विचारप्रक्रियेला सुरुवात झाली. सुरुवातीस ही प्रक्रिया प्राथमिक स्वरूपाची आणि अपरिपक्व होती. ह्या तार्किक विचारप्रक्रियेच्या सहाय्याने मानवाने सभ्यता निर्माण केली आणि इतर प्राणिमात्रांबाबत आणि आपल्या प्रजातिबांधवांबाबतही कसलाच विचार न करता सारं जग पादाक्रांत केलं. विज्ञानाची धारदार तलवार माणसाच्या भल्यासाठी असल्याने ती विवेकबुद्धीच्या माणसांच्याच हाती राह्यला हवी.
आपली आजची सभ्यता आधुनिक आणि प्रगतीशील असली तरी ती पूर्वीपेक्षा चांगली आहे असं म्हणता येणार नाही. आपल्याला अधिकाधिक विवेकशील सभ्यता निर्माण करायला हवी. आपल्या सभोवतालच्या निसर्गाचे आणि त्यातील सर्व प्रजातींचे शोषण आणि संहार थांबवून अशा उत्तम पद्धती वापरल्या पाहिजेत की ज्यांच्यामुळे सर्वांच्या रास्त गरजा कोणताही धोका उत्पन्न न होता निरंतरपणे भागवता येतील आणि सर्वांना सुखाने आयुष्य कंठता येईल. तीच पूर्ण विवेकी, उच्च सभ्यता असेल.

टी एस् रासकर

विवेकवादाच्या काळातील श्रद्धा

ही हसन सुरूर यांनी लंडनहून दिलेली बातमी आहे, ‘ती खरोखरच चमत्काराने बरी झाली का?(द हिंदू, ऑगस्ट २०). हसन आपल्या लेखामधे धर्म आणि अडमुठेपणा (इर्रॅशनॅलिटी) यांच्यातील नातेसंबंधांचे अनेक मुद्दे उपस्थित करतात आणि ज्ञानाच्या प्रगतीबरोबर धर्माची अधोगती होत असते या पारंपरिक शहाणपणाचं खंडन करतात. या अहवालाची पाळंमुळं सर्व छोट्यामोठ्या धर्मांपर्यंत पोचत असल्याने या लेखाची पाश्र्वभूमी थोडी समजावी म्हणून अहवालाबाबत थोडीशी माहिती देणे आवश्यक आहे.
व्हॅटिकनने कोणालाही संत म्हणून जाहीर करण्यासाठी त्या व्यक्तीने काही तरी चमत्कार करून दाखविल्याचा पुरावा आवश्यक असतो. मदर थेरेसा यांच्या नावावर असलेल्या चमत्काराचा पुरावा किती तकलादू होता ते पहा. एका ३० वर्षाच्या अशिक्षित मोनिका बेसरा नावाच्या बंगाली महिलेने हा चमत्काराचा पुरावा सादर केला होता. बेसराला एका असाध्य कर्करोगाच्या गाठीने पछाडले होते. मदर थेरेसा यांनी तिला त्यांच्या मृत्यूनंतर दिलेल्या आशिर्वादाने तिचा रोग चमत्काराने नाहीसा झाला आणि ती ठणठणित बरी झाली. ह्यातील तीन महत्त्वाचे दावे ‘चमत्काराने, ‘असाध्य‘ आणि ‘मरणोत्तर आशिर्वाद यांची छाननी करणं आवश्यक आहे. त्याची अधिकृत माहिती अशी: मे १९९८ मधे तिच्या पोटामधे प्रचंड मोठी कर्करोगाची गाठ असल्याचे निदान झाले होते. दोन महिने तिचे पोट इतके दुखत होते की ती उभी राहू शकत नव्हती. एक दिवस ती रखडत रखडत मदर थेरेसा यांच्या रायगंज येथील डेस्टिट्यूट होममधे पोचली. तिथल्या सिस्टर्सनी तिला औषध दिलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग त्यांनी मदर थेरेसाचा धावा करण्याचे ठरवले. हे काम मदर थेरेसाच्या पहिल्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे सेप्टेंबर ५, १९९८ ला केले. त्या दिवशी त्यांनी मदर थेरेसाच्या मृत देहावर जे चांदीचे पदक ठेवले होते ते बेसराच्या पोटावर बांधले. ते बांधल्यावर बेसरा गाढ झोपी गेली. ती जेव्हा जागी झाली तेव्हा कर्करोगाच्या गाठीचा थांगपत्ता राहिला नव्हता. अहवालानुसार बेसराचा दावा असा होता, ‘माझं फुगलेलं पोट खपाटी जावू लागलं आणि तीन दिवसात ते पूर्ण बरं झालं. मला खात्री आहे की मदर थेरेसानेच मला बरे केले.
ह्या तिच्या दाव्याला लोकांनी आव्हान दिले. संडे टाइम्स या ब्रिटिष वृत्तपत्रात त्याला ‘मदर थेरेसाच्या संतपणाला भक्कम पाठिंबा देणारा तथाकथित जबरदस्त चमत्कार असं म्हटलं. अर्थात पुढील मजकुरात भर होता ‘तथाकथितपणावर. ऑब्झर्वरने सरळ सरळ त्याबद्दल शंका व्यक्त केली. त्यांनी लोकांच्या नजरेस आणून दिलं की ही बेसरा कोण होती हेही अधिकृतपणे उघड केलेलं नाही. या सर्व प्रकरणात सिस्टर निर्मला आणि त्यांच्या पंथाने इतकी गोपनीयता बाळगली आहे की त्यामुळेच या बाबतीत अनेक शंका उपस्थित होतात; शिवाय बेसराच्या सांगण्यामधे बरीच विसंगती आहे. ऑब्झर्वरच्या रायगंज येथील वार्ताहाराने लिहिले आहे, ‘‘हेन्री डिसूझा या कलकत्त्याच्या आर्चबिशपने ‘नामांकित डॉक्टरांनी ट्यूमर खरोखरच नाहीसा झाल्याचे आणि हा चमत्कारच असल्याचे मान्य केले आहेङ्क असा दावा केला; परंतु त्याबाबत एका डॉक्टरने शंका उपस्थित केली आहे.
याच्याशी संबंधित आणखी एक गोष्ट, ‘धाडसी दावा: देव मानवी रूप घेतो या मथळ्या खाली रॉबर्ट एम् प्राइस म्हणतात, ‘‘पहिल्या शतकातील ख्रिश्चॅनिटीमधली केंद्रवर्ती व्यक्ती स्वतः ख्रिश्चन नव्हती. सायमन बद्दलच प्रेषितांपेक्षा जास्त लिहिलं गेलं आहे. सायमन स्वतःला एकमेव खऱ्या देवाचा अवतार मानत असे. सायमनची चमत्कार करण्याची ख्याती आणि स्वयंघोषित देवत्व यातूनच जीजस ख्राइस्ट हा ईश्वराचा अवतार असल्याची कल्पना जन्माला आली असं काही विद्वान मानतात. चमत्कारांमुळे सायमनला प्रसिद्धी मिळाली. त्याने रोमन बादशहा नीरो याच्यावरही तथाकथित हवेतून उडण्याच्या चमत्काराने छाप पाडली होती. जस्टिन मार्टिनच्या रिपोर्टप्रमाणे इ.स.१७५ च्या सुमारास रोम आणि समारियामधे सायमनचीच पूजा होत होती. सायमनच्या देवत्वाच्या दाव्याचं महत्त्व ओळखून माटरने जीजस मधेच देवाचं मन समाविष्ट आहे असा जोरदार युक्तिवाद केला. ‘स्कूल ऑफ अलेक्झांड्रियाचे हे मुख्य तत्त्व बनले. याच इजिप्तमधल्या शहरात दुसèया शतकाच्या मध्यावर ख्रिश्चन उच्च शिक्षणाची ही पहिली संस्था उभी राहिली. परंतु कॅथोलिक चर्चने जीजस हा देवाचा अवतार आहे असे मान्य करायला पुढील ३०० वर्षांचा काळ वादावादीमधे जावा लागला. त्याचा अर्थ असा झाला की जीजस हा खुद्द देवाचा अवतार आणि देवाचा पुत्रही मानला गेला.
वरील परिच्छेदातील कळीचे शब्द-चमत्कार करणे, देवत्व, पूजा, अवतार, देवाचा पुत्र, आणि देव-विशेष लक्षात घ्यायला हवेत. ह्यांच्यापैकी एकाही शब्दाचा अर्थ आजपर्यंत स्पष्ट झाला नसला तरी आजही ते सारे शब्द धर्म, धार्मिक संस्था, रूढी, आचार यांना आधार देवून वैधता आणण्यासाठी तुमच्या तोंडावर येताजाता फेकले जातात. प्राइसच्या या निवेदनाशेजारी सरूरचा ‘द हिंदूमधे प्रसिद्ध झालेला रिपोर्ट ठेवून बघा. तुमच्या लक्षात येईल २००० वर्षांपूर्वी उदयाला आलेला ख्रिश्चन धर्म आजही बदललेला नाही.
मदर थेरेसा, जिने आपल्या हळुवार जखमा भरून आणणाऱ्या स्पर्शाने कित्येकांना आधार दिला, जगातील दारिद्र्याने त्रस्त असलेल्यांसाठी जिने आपले आयुश्य वेचले, इत्यादी इत्यादी ती मदर आधीच जगामधे कीर्तीच्या आणि सन्मानाच्या शिखरावर पोचलेली आहे. अशा आणखी ‘मदर असत्या तर जग नक्कीच जास्त सुखी झालं असतं. देवमाणसांच्या मांदियाळीमधे किंवा मानवताधर्मामधे तिला अत्युच्च स्थान मिळालेलं आहे. परंतु तिच्या मृत्यूनंतर तिच्या संतत्वाबाबत उभे केलेले वादाचे मुद्दे मात्र चेटक्यांच्या तंत्रमंत्रासारखे वाटतात.
धर्मांमधे आणि विशेषतः प्रेशितप्रस्थापित धर्मांमधे चमत्कारांचं (जादू या अर्थी यातुधर्मांमधे असतं तसं) केन्द्रस्थानी असणं सर्वांनाच जाणवतं. चमत्कारांच्या जागी किंवा चमत्कारांसमवेत हिदू धर्मासारख्या ज्यांचे संस्थापक नाहीत अशा धर्मांमधे पुष्टी देणारी मिथके असतात. चमत्कार आणि मिथके हीच धर्माची जीवनदायी सुधा आणि धर्मांना तारून नेणारी नौका असतात आणि त्यांच्याविना धर्म शक्तिहीन होतील आणि रसातळाला जातील.
प्रचीन आणि मध्ययुगीन समाजामधे या गोष्टी असणं आपण समजू शकतो पण आधुनिक समाजामधे, २१व्या शतकात जागतिकीकरण होत असताना आणि सारं जग संकोच पावत एक खेडं होत असताना चमत्कार आणि मिथके केवळ कालविसंगतच नव्हेत तर विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विकासामधे आणि प्रसारामधे अडथळे बनत आहेत. आणि विशेषतः अनेक संस्कृती, धर्म आणि इतर वैविध्य असलेल्या समाजांमधे जिथे एकमेकांना विसंगत असलेल्या श्रद्धाप्रणालींना सहजीवन जगणे अनिवार्य असते अशा समाजांच्या मानवाच्या विकासामधेही अडचणी उत्पन्न करीत आहेत.
हे लक्षात घेता आधुनिक संदर्भामधे व्हॅटिकन सुद्धा एका डगमगणाऱ्या पायावर लटपटत आहे. मदर थेरेसाला संत ठरविणं किंवा  तिला सद्गती मिळाली असं जाहीर करणं वेगळं; ती निःसंशय निसर्गाने निर्माण केलीली सर्वात महान उदात्त मानव होती. परंतु अशा व्यक्तीला संतपद बहाल करण्यासाठी, तिच्या मरणानंतर, कुणाला तरी ती चमत्कार करीत असे आणि अजूनही करते हे सिद्ध करायला लागावं हे वेगळं. मदरला न्याय देताना तिने कधीच चमत्कार करण्याच्या शक्तीचा दावा केला नव्हता हे मान्य करायला हवं. मला संतपद द्या असंही ती कधी म्हणाली नाव्हती त्यामुळे तिच्या मरणानंतर जे काही घडतं आहे त्याला ती मुळीच जबाबदार नाही. तिने जे निःस्वार्थीपणे काम केलं ते बघता हजारो बेसरा तिच्या चमत्काराचे पुरावे सादर करायला पुढे सरसावतील.
जगामधे कुठेही चमत्काराच्या घटना स्वतः पाहणारा साक्षीदार किंवा अनुभवसिद्ध पुरावा किंवा पडताळा पाहता येईल असा चमत्काराचा पुरावा उपलब्ध नाही. ज्याला चमत्कार मानण्यात येतं ते केवळ जादू, हातचलाखी किंवा सांगोवांगीच्या कथा असतं. या अर्थाने त्या चमत्कार करणाèया पदकाचा आणि त्यातील चमत्कार करण्याच्या शक्तीचा दावा, ज्यावर इतरांनी विश्वास ठेवावा असं त्या नन्सना वाटतं ते सर्व गोंधळात टाकणारं, किंबहुना कपोलकल्पित आहे. अपरिहार्यतेच्या नियमातील (लॉ ऑफ द इनएव्हिटेबल) सम्भवनीयतेच्या घटकाचा (प्रॉबॅबिलिटि फॅक्टर) परिणाम म्हणून जरी याकडे पाहिलं तरी हा चमत्कार किंवा देवत्व ठरू शकत नाही.
जर त्या पदकाला मदरच्या आशिर्वादाने किंवा आशिर्वादाविना असाध्य रोग बरे करता येत असतील तर ‘सिस्टर्स ऑफ चॅरिटीने अशी लाखो पदके बनवावीत आणि जगातील सर्व रोग आणि व्याधी नष्ट कराव्यात. एका प्रसंगात मदर थेरेसा त्यांच्या हाकेला धावून आली तर ती पुन्हा दुःख निवारणासाठी येणार नाही अशी शक्यता नाही. डॉक्टर्सनीही बेसराच्या रोगमुक्त होण्याला चमत्कार मानले असा नन्सनी केलेला दावा म्हणजे एखादीने आपण विमानापघातातून कसे आश्चर्यकारकपणे वाचलो हे सांगण्यासारखे आहे.
व्हॅटिकनचे हे चमत्काराचा पुरवठा करणे कदाचित त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी, टिकाव लागण्यासाठी आणि भोळ्या भाबड्या ख्रिश्चनांसाठी उपयोगी असेल; आणि विशेषतः जेव्हा पाश्चिमात्य जगात ब्रह्मचर्य, लैगिकता, प्रीस्टहुड बाबत मोठा ऊहापोह चालू आहे अशा वेळेस.
जर वैज्ञानिकांनी असं सिद्ध केलं की मदरने जे काही केलं ते जरी उदात्त असलं तरी सामान्य होतं, ऐहिक होतं. आणि तिला मरणोत्तर अलौकिकता बहाल करणं मान्य करता येणार नाही. व्हॅटिकन आधीच्या संतत्व बहाल करण्याच्या प्रसंगांचा विचार करून पारलैकिकातून ऐहिक आणि दैवत्वातून मानवी वेगळे करील का? त्यामुळे हिंदू आणि इस्लाम सारख्या इतर धर्मांनाही धडा शिकता येईल. सर्व जनतेच्या हितासाठी एवढेच नव्हे, जगाच्या कल्याणासाठी या मुद्यांचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. त्यामुळे जगातील गूढता, अविवेक, मूलतत्त्ववाद, तालिबानवाद, बुद्धाच्या मूर्तींचा विनाश आणि अशाच इतर कटु गोष्टी हळूहळू कमी होत जातील.
अखेरीस व्होल्टेअरने म्हटले होते, ‘माणसे कधीच स्वतंत्र होणार नाहीत जोपर्यंत शेवटच्या राजाला शेवटच्या प्रीस्टच्या आतड्यांनी गळफास केला जात नाही तोपर्यंत. पण जर राजा आणि प्रीस्ट एकवटले तर? व्हॅटिकनच्या पुढ्यात हाच तर पेचप्रसंग आहे.

पी राधाकृष्णन्
(‘द हिंदूच्या सौजन्याने)

विवेक: यशाचे जीवितकार्य

चला नवी घडी घालूया: व्यक्तीच्या जीवनात नवी पहाट उजाडावी म्हणून मान्स रूढ असलेल्या अंधश्रद्धा नष्ट करण्याचा, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा, आणि मूल्याधारित विवेकवाद समाजाच्या सभासदांच्या मनामधे qबबवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. काही थोड्या लोकांचा अपवाद सोडल्यास आजच्या खालावत चाललेल्या सामाजिक परिस्थितीमुळे सर्वजण निष्क्रीय झाले आहेत; निमूटपणे सोसतात, इतरांचे वर्चस्व चालू देतात पण क्वचित प्रसंगी त्यांची सहनशीलता संपते. आपण असहाय्य, भेदरट आणि दिशाहीन होत चालले आहोत. जिथे तिथे तडजोड करण्याची आपल्याला सवयच जडली आहे. निर्दयपणे होणारं जागतिकीकरण, जीवनाचं व्यापारीकरण, प्रसारमाध्यमांमुळे फोफावणारा भोगवाद, निष्पाप जीवांना व्यसनी बनविणाऱ्या वस्तूंचा पुरवठा, नैतिक मूल्यांची घसरण इत्यादी गोष्टींनी माणसाचं जगणं दुःखद झालेलं आहे. धूर्त राजकारणी आपल्या मर्जीनुसार धोरणं ठरवतात; आपण सर्व त्यांच्या तावडीत सापडले आहोत. हे सर्व कमी आहे की काय म्हणून आता या राजकारणी मंडळींनी धार्मिक कट्टरपंथियांशी हातमिळवणी केली आहे. आणि दोघं मिळून हिंसा , क्रौर्य वाढविण्यास, मानवी मूल्ये पायदळी तुडविण्यास आणि आपल्या स्वार्थास प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे सामाजातलं चैतन्य आणि उत्साह नाहीसं झालं आहे. सगळे लोक जणू काहीतरी अज्ञात, अनाकलनीय ईप्सिताच्या शोधामधे पळत सुटले आहेत.
या परिस्थितीतून बाहेर पडण्याची क्षमता, कुवत आमच्यात आहे याचा आम्हाला विसर पडला आहे. काही थोड्या विवेकवादींच्या भगीरथ प्रयत्नांमुळे ही परिस्थिती बदलू शकेल. लोकांच्यामधे आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती जागवायला हवी. विस्तार आणि विकासाच्या या ‘लाँग मार्चङ्कची मशाल हाती घेण्यासाठी आत्मविश्वास आणि चैतन्य ज्यांच्यात सळसळत आहेत असे तरूण पुढे यायाला पाहिजेत. आपल्यात जे थाडे विवेकवादी आहेत ते या तरुणांना आनंदाने योगदान देतील. समाजामधे आमूलाग्र बदल घडवून आणायचं सामथ्र्य केवळ तरुणांच्याच अंगी असतं. चला समाजसुधारणेचं पहिलं पावूल उचलू या.
विचार करण्याची आणि ते विचार कृतीत उतरविण्याची ताकद आपल्यामधे नक्कीच आहे. ही कुवत मानवाला करोडो वर्षांच्या उत्क्रंतीमधून प्राप्त झालेली आहे. विवेकामुळे प्राप्त झालेल्या आत्मविश्वासाला उद्युक्त करायला आव्हान द्यावं लागतं. म्हणून आम्ही तुम्हाला आव्हान करीत आहोत या निष्क्रीय, नाउमेद करणाऱ्या , उच्छेदक परिस्थितीतून वर उठा. इतिहासाने हे दाखवून दिले आहे की वैज्ञानिक वृत्ती आणि तर्काधारित आचरणाने सर्व समस्या सोडविता येतात आणि परिस्थितीवर मात करता येते. या ‘मिशन मधे सामिल होण्यासाठी अंनिस सर्वाना आवाहन देत आहे.
या मिशनचा कार्यक्रम चार आघाड्यांवर राबवायचा आहे. त्या चार आघाड्या अशा:
१. परंपरागत चालत आलेल्या अंधश्रद्धांमधे कर्मकांड आणि अनेक आचार असे असतात की त्यापायी माणसाचा कष्टाने मिळविलेला पैसा, त्याचा किंमती वेळ आणि त्याचे कष्ट यांचा अपव्यय होतो. त्यामधे समाजचेही नुकसान होतच असते. आजच्या जमान्यामधे असा अपव्यय परवडण्यासारखा नाही. अंधश्रद्धांमुळे गरीब आणि दुबळे लोक गरीब-दुबळेच राहतात आणि त्यांना त्या असहाय्य परिस्थितीतून वर उठायला काही वावच राहिलेला नसतो. असा अपव्यय करणाèया अंधश्रद्धांना सामूहिक बळाच्या सहाय्याने नष्ट करण्याची आपण शपथ घेवू या. कर भरणाऱ्याचा पैसा जे सत्ताधीश सणसमारंभ, कुंभमेळा, देवळं-मशिदी-चर्च इत्यादींच्या डागडुजीसाठी तसेच स्थानिक उत्सवांसाठी वापरतात त्यांना आपण जोरदार विरोध करू या आणि हा पैसा पाणी, वीज, दळणवळण, आरोग्य, प्राथमिक शिक्षण आणि इतर जनकल्याण आणि विकासाच्या कार्यक्रमांसाठी वापरण्यास भाग पाडू या.
२. माणूस विवेकी नसला तर तो मनाने अंधश्रद्धांना आणि आचरणाने व्यसनांना बळी पडतो. व्यसनांमुळे त्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडतं, यातना सहन कराव्या लागतात आणि आयुष्य कमी होतं. वैयक्तिक पातळीवर आपण स्वतः कोणत्याही व्यसनांना बळी न पडण्याची व्यसनी पदार्थांना स्पर्षही न करण्याची शपथ घेवू या. व्यसनाधीनता ही आता राष्ट्रीय समस्या झाली आहे. महाराष्ट्र शासनाने तर कर मिळविण्यासाठी जागोजागी दारू मिळण्याची सोय केली आहे तसेच दारू बनविण्याचे परवाने आणि सुविधा दिल्या आहेत. यातून नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे. व्यसनमुक्तीसाठी शासनाच्या तात्कालीन व दीर्घकालीन योजना काय आहेत हे लोकांना कळावे म्हणून राज्यकत्र्यांनी तात्काळ एक श्वेतपत्रिका प्रसृत करावी असा आपण आग्रह धरू या.
३. एकूणच असहिष्णुता वाढल्याने अल्पसंख्याक समाज अस्वस्थ होत आहे. यातून हिंसक वृत्ती बळावते आणि कायदा व सुव्यवस्थेला धोक्यात आणणाèया घातपाती कृत्यांना प्रोत्साहन मिळते. कुठेही दंगा झाला तरी त्याचे बळी दारिद्य्रात खितपत पडलेले दलित वर्गाचे लोकच असतात. त्यामुळे वैयक्तिक तसेच सामाजिक शांततामय सहजीवनाला धोका उत्पन्न होतो. अशांतता पुरुषी वर्चस्वामुळेही वाढते. त्यामुळे त्रस्त व निराश झालेल्या स्त्रिया आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त होतात. तेव्हा आपण आणखी एक शपथ घेवू या की आम्ही धर्म, जाती, प्रदेश, भाषा किंवा लिंग यांविषयी काहीही अहंकार किंवा श्रेष्ठत्वाची भावना मनामधे बाळगणार नाही; हिंसेचा कधीही गौरव करणार नाही; जे कोणी हिंसा करीत असतील, दंभ बाळगत असतील त्यांना शासनाने दंड द्यावा असा आम्ही आग्रह धरू.
४. एड्स हा आजकाल बोकाळलेला रोग समाजाला घातक ठरला आहे. नवविवाहित तरुणी या रोगाला हकनाक बळी पडतात आणि त्यामधे त्यांचे सर्वस्व लुटले जाते. हा रोग टाळण्यासाठी आपण विवाहबाह्य संबंध ठेवता कामा नये. आपला नवरा ‘एच आय व्ही पॉझिटिव्हङ्क आहे हे लग्न झाल्यावरच मुलींना समजते. लग्नाआधी हा संसर्ग नसल्याचे प्रमाणपत्र नवरामुलगा देण्यास तयार नसतो. विवाहाच्या कायद्यामधे दुरुस्ती करून नोंदणी करताना असे प्रमाणपत्र देण्याची सक्ती व्हायला हवी. त्यामुळे प्रमाणपत्र मागणं आणि खबरदारी घेणं शक्य होईल. आणि भविष्यातील अडचणी टाळता येतील.
हे सारे कायमस्वरूपी बदल आपण घडवून आणू या. मान्स प्रत्येकाला या मोहिमेत तनमनधन अर्पण करून सामील होण्याचे आवाहन करीत आहे. ज्यांना या मोहिमेत सामील होण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांच्या जवळ असलेल्या मान्सच्या शाखेशी संपर्क साधून माहिती मिळवावी.

अंधश्रद्धेचे धोके
‘‘उच्च शैक्षिणिक संस्थांमधे ज्योतिष शास्त्र शिकविण्यास सुरुवात करणे ही एक अधोगतीकडे नेणारी संकल्पना आहे.असं सीताराम येचुरी गरजले. अंधविश्वासामुळे निर्माण होत असलेल्या धोक्यांबद्दल ते बोलत होते. ते म्हणाले, ‘मुरली मनोहर जोशी म्हणाले होते ज्योतिष शास्त्राचा शिक्षणामधे अंतर्भाव झालाच पाहिजे. कारण आपल्या पूर्वापार श्रद्धांचा आपण आदर केला पाहिजे, त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. याबाबतीत त्यांनी एक किस्सा सांगितला, ‘नुकतेच चेन्नईमधे एक मंत्र्यांचं प्रतिनिधीमंडळ गेलं होतं. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी झाली होती. व्यासपीठावरील टेबलावर पाणी भरलेले पेले होते त्यातील एक प्याला रंगीत पाण्याने भरला होता. एक मंत्री महाशय तिथे पोचले आणि त्यांनी तो रंगीत पाण्याचा पेला पाहिला. आपल्यासाठीच हा सरबताचा पेला असणार असा त्यांना विश्वास होता. त्यांनी ते रंगीत सरबत पिवून टाकले. आणि पुढे तीन दिवस ते हॉस्पिटलमधे बिछान्यावर पडून राहिले. अंधविश्वासाचं फळ, आणखी काय? प्रत्यक्षात तो ‘खास सरबताचा‘ पेला नसून ती फुलदाणी होती. जुनी फुले काढून टाकून त्याजागी ताजी फुले आणून ठेवण्यासाठी माळी बागेत गेला होता. तेव्हा येचुरी म्हणतात, ‘विश्वास आणि वैज्ञानिक विचार करणं यामधे नक्कीच फरक आहे- तो म्हणजे तीन दिवसांचा हॉस्पिटलमधला मुक्काम!
‘या ज्योतिषशास्त्राप्रमाणेच शासनाचा ऐतिहासिक नोंदी बदलण्याचा इरादासुद्धा काळजी करायला लावणाराच आहे. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष यांना हिंदूधर्म हा शुद्ध आणि एतद्देशीय धर्म आहे हे सिद्ध करण्यासाठी आर्य लोकही एतद्देशीयच होते, ते बाहेरून भारतामधे आलेले नाहीत असेही सिद्ध करणे भाग असते. मग आर्य एतद्देशीय होते असं म्हणायचं तर मोहेंजोदारो आणि हडप्पा येथे आर्य संस्कृती होती हे सिद्ध करणं भाग आहे. या आर्य संस्कृतीचं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे घोडा. त्यांना जलद प्रवास आणि युद्धासाठी घोडे फार आवश्यक होते. हडप्पा आणि मोहेंजोदारो येथील उत्खननाच्या जागी घोड्याचं एक हाड सापडलं. लगेच ते सुतावरून स्वर्गाला पोचले. घोड्याचं हाड उत्खननाच्या आसपास असणं हा तेथील वसती आर्यांचीच होती याचा सबळ पुरावाच ठरवण्यात आला. परंतु त्या हाडाचं जेव्हा विश्लेषण करण्यात आलं तेव्हा असं समजलं की ते केवळ २०० वर्षांपूर्वीचं हाड आहे!
भाजपाच्या आणखी एका इतिहासकाराची एक लोणकढी थाप येचुरींनी सांगितली, ‘उत्खननाच्या ठिकाणी एका बैलासारख्या दिसणाऱ्या, पण लांब केस आणि आयाळ असलेल्या प्राण्याची मूर्ती सापडली. त्याची प्रतिमा अनेक कॉंप्यूटरमधे फीड करून काय निष्कर्ष निघतो ते पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका काँप्यूटरने निष्कर्ष काढला की तो घोडा असावा. मग तो घोडाच म्हणजे आर्य संस्कृतीचीच खूण असली पाहिजे आणि ज्या अर्थी तो भारतातील उत्खननात सापडला त्याअर्थी भारत हीच आर्यांची जन्मभूमी असली पाहिजेङ्क. येचुरी पुढे म्हणाले, ‘आता तुम्ही जेव्हा बैलाला घोडा म्हणता आणि इतरांना बैलाची मूर्ती घोड्याची आहे असे पटवता तेव्हा तुमचं तत्त्वज्ञान आणि तुमचे सिद्धान्त कोणत्या प्रकारचे आहेत हे उघड होतं.
येचुरी जेव्हा विश्वविद्यालयामधे प्राध्यापक होते तेव्हाचा एक मजेदार किस्सा त्यांनी सांगितला, ‘एका प्रोफेसरसाहेबांनी आपल्या बागेमधे एक १० फूटखोल खड्डा खणला. त्यात त्यांना एका प्रकारच्या तारेचा तुकडा सापडला. ते धावत दुसऱ्या प्रोफेसर मित्राकडे गेले आणि म्हणाले पहा मला काय सापडलंय! यावरून हेच सिद्ध होतं की आम्ही भारतीय प्राचीन काळी फार प्रगतावस्थेत होतो. आमच्याकडे टेलिफोन होते! दुसèया प्रोफेसरसाहेबांनी तोच खड्डा आणखी खोल खणला आणि त्यांना काहीच सापडलं नाही. मग ते पहिल्या प्रोफेसरसाहेबांकडे घाईघाईने गेले आणि म्हणाले, बघा मला काहीच सापडलं नाही! म्हणजे प्राचीन काळाच्याही आधी-अतिप्रचीन काळी-आपण भारतीय प्राचीन काळापेक्षाही जास्त प्रगत होतो. आपल्याकडे तेव्हा ‘वायरलेस होते.
‘हिदुधर्माची शुद्धता मोजण्याबाबत येचुरी म्हणतात, ‘मी आंध्र प्रदेशचा आहे. आंध्र प्रदेशात मुलगी वयात येताच तिचं मामाशीच लग्न लावून दिलं जातं. उत्तर भारतामधे या प्रथेला हीन मानतात आणि असं करणाऱ्याला शिक्षासुद्धा होवू शकते. आता प्रश्न असा उभा राहतो की यांच्यातील सच्चा हिंदू कोणाला मानायचं?
‘ हिंदुधर्माचा शुद्धपणा मोजायचा प्रयत्न करणं किती निरर्थक आहे याचं ‘माहाबळी हे एक उत्तम उदाहरण आहे. केरळ प्रांतात आणि केरळी लोकांमधे ओनम हा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. कारण लोक असं समजतात की महाबळी हा उत्तम आणि कल्याणकारी राजा त्या दिवशी त्याच्या प्रजेला भेटायला येतो. आणि प्रजेचा हा लाडका राजा वर्षातून एक दिवस आपल्या प्रजेसमवेत घालवतो. उत्तर भारतामधे महाबळी हा एक राक्षस समजला जातो. जग वाचावं म्हणून विष्णूला त्याला पाताळात दडपून टाकावं लागलं. यापैकी सच्चे हिंदू कोणाला म्हणायचं? बळीची पूजा करणाèया केरळी लोकांना की बळीला राक्षस मानणाऱ्या उत्तरभारतीयांना?
‘धार्मिक श्रद्धांना विरोध करणं म्हणजे रामाने कृष्णभक्तांना कृष्णाची पूजा थांबवा असं सांगणं आहे आणि उलटपक्षी कृष्णाने रामभक्तांना रामाची पूजा करण्यापासून परावृत्त करणं आहे. प्रत्यक्ष देवालासुद्धा कोणाची पूजा करा वा कोणाची पूजा करू नका हे सांगण्याचा अधिकार नाही. निरीश्वरवाद हाही एक विश्वास आहे. पण ईश्वर न मानणाऱ्यांनासुद्धा शिक्षा करण्याचा अधिकार देवाला नाही. देवालाच जिथे धर्म आणि धार्मिकतेबाबत काही सांगण्याचा अधिकार नाही तिथे हे भाजप आणि त्यांचे भगवे बांधव देवधर्माबाबत आम्हाला का सांगत असतात?
(सीताराम येचुरी, भारतीय कम्यूनिस्ट पार्टीच्या पोलिटब्यूरोचे मेंबर, यांनी ११ ऑक्टोबर २००३ ला निगडी, पुणे येथे दिलेल्या भाषणाचा गोषवारा. निगेल जे. शॉनेसी यांच्या उताऱ्यावरून  .)

सीताराम येचुरी

विज्ञान आणि तर्कशक्ति
विकसित देशांमधे बुद्धिमत्ता वाढली आहे आणि त्याबरोबरच धर्मावरील श्रद्धा कमी झाली आहे असं वैज्ञानिक अभ्यासातून दिसून आलं आहे. साहजिकपणे यातून असा निष्कर्ष निघतो की लोक जास्त हुशार होत आहेत; हुशार लोक अतार्किक समजुती सोडून देतात; म्हणून वाढत्या हुशारीसोबत अश्रद्ध लोकांची संख्या वाढते. परंतु वस्तुस्थिती इतकी सरळ, सोपी नाही असं वॉटरलू विश्वविद्यालयाचे मानद शास्त्रज्ञ जेम्स अॅलन चेनी यांचं म्हणणं आहे.
परंतु प्रथम हे लक्षात घ्यायला हवं की वर उल्लेखिल्याप्रमाणे होत असलेला परिणाम लक्षणीय आहे. इंग्लंडचंच उदाहरण घ्या. चर्चमधे जाणाऱ्यांची संख्या पूर्वीच्या मानाने १/३ पेक्षा कमी झालेली आहे. आणि निरीश्वरवादी काही पूर्वीइतके विरळा राहिलेले नाहीत. परंतु अनेकजण स्वतःला निरीश्वरवादी म्हणविण्याऐवजी अश्रद्ध म्हणविणं पसंत करतात त्यामुळे सर्वेक्षण दाखवतं त्यापेक्षा बरेच जास्त लोक निरीश्वरवादी असावेत. इतर अभ्यासातून असंही दिसून येतं की उच्च वर्गातील शास्त्रज्ञांमधे ७% शास्त्रज्ञ श्रद्धावान असतात. विज्ञान आणि धर्माला नकार या दोन गोष्टींमधे काही संबंध इथे दिसून येतो का?
चेनी असं दाखवून देतो की (विकसित देशातल्यासारख्या) वैज्ञानिक शिक्षणामुळे लोक अमूर्त संकल्पना हाताळायला शिकतात आणि आपण चुकत असणं शक्य आहे याची त्यांना जाण येते. कारण एखादी संकल्पना बरोबर आहे का असा प्रश्न पडणं हीच मुळात वैज्ञानिक संकल्पना आहे. असा प्रश्न पडल्याने मग लोक जास्त तर्कशुद्ध विचार करू लागतात आणि धर्मासारख्या तर्कविसंगत कल्पना टाकून देतात. लोकांना जेव्हा अमूर्त(अॅब्स्ट्रॅक्ट), निरपेक्ष (कॅटॅगोरिकल) आणि गृहीत (हायपोथेटिकल) (एसीएच=अनिगृ) विचार करण्याची गरज भासू लागली तेव्हा हीच वृत्ती द्विगुणित झाली. आणि थोड्याफार प्रमाणात सर्वानाच वैज्ञानिक शिक्षण क्रमप्राप्त झालं. विकसनशील देशांमधल्या शेतकèयांना या कौशल्याची गरज भासत नाही त्यामुळे ते असा विचार करू शकत नाहीत. म्हणून केवळ विकसित देशातील लोकच जास्त हुशार (अनिगृ पद्धतीने विचार करण्यावर आधारित असलेला उच्च आयक्यूवाले) असतात आणि केवळ विकसित देशातील लोक तर्कविसंगत धर्माचा अव्हेर करतात. ही अनिगृ विचारपद्धती खरोखरच श्रेष्ठ आहे आणि आपल्या जमान्यात झालेल्या सर्व उपलब्धी या विचारपद्धतीनेच प्राप्त झाल्या आहेत.
तेव्हा जग जसं अधिकाधिक सुशिक्षत होईल, जास्त चांगला विचार करायला शिकेल आणि अगदी प्राथमिक स्वरूपात का होईना वैज्ञानिक संकल्पना आणि ज्ञान हाताळू लागेल तेव्हा लोक हळू हळू उमजतील की त्यांचा धर्म नव्या युगाशी जुळत नाही आणि अर्थहीन झाला आहे.
चेनीच्या मते विकसित देशांमधे विचारप्रक्रियेचा विकास पूर्ण झाला आहे परंतु विकसनशील देशांमधे विकास होत राहील. याचा अर्थ असा की येत्या काहीशा दीर्घ काळामधे धर्माचं आकर्षण २० % लोकांना असेल (जसं आज स्कँडिनेव्हियात आहे). पूर्वीच्या ८० % पेक्षा ही बरीच सुधारणा आहे. इथे माझा प्रश्न असा आहे की हे असं युनायटेड स्टेट्समधे का घडत नाही? तिथे शाळांमधून विज्ञान शिकवलं जात नाही का? का काही निवडक लोकांनाच वैज्ञानिक शिक्षण लाभू शकतं?
पुढचा विचार असा आहे की एकदा धर्माने झपाटलेल्यांच्या विज्ञानाच्या शिक्षणामुळे धर्माची पीछेहाट होत आहे हे लक्षात आले म्हणजे मग ते कशाचा पुरस्कार करू लागतील? मला वाटतं की त्यांना नळाचं पाणी, वीज, सेलफोन, टीव्ही, मोटारी इत्यादी सर्व टाकावू वाटेल आणि प्राथमिक अवस्थेमधल्या गुहेत राहणाèया मानवाचं निसर्गावलंबित जीवन हवंसं वाटू लागेल. पण एक चांगली बातमी ही आहे की विज्ञानाचं शिक्षण परिणामकारक होण्यासाठी अत्युच्च असण्याची मुळीच गरज नाही. त्या शिक्षणात केवळ विज्ञानाची मूलभूत तत्वं आणि प्रयोग करण्याचं तसंच प्रश्न विचारण्याचं महत्त्व शिकवलं की पुरेसं आहे.
ज्यांना या विषयात गोडी वाटत असेल त्यांनी ‘सायन्स अँड रीझन- द ह्यूमन माइंडङ्क हा जॉन ड्रेपर यांचा ६-८-२०१० चा संपूर्ण लेख वाचावा. तो वाचनीय आहे आणि त्यामधे तांत्रिक परिभाषेचा फारसा वापर केलेला नाही.
ईश्वर आणि विज्ञान जुळू शकत नाहीत
ही कल्पना जे.बी.एस हाल्डेन यांनी १९३४ मधे ‘फॅक्ट अँड फेथङ्क यामधे प्रथम मांडली, ती अशी: ‘एक वैज्ञानिक म्हणून माझं आचरण निरीश्वरवादी असतं. म्हणजे मी जेव्हा एखादा प्रयोग आखतो तेव्हा त्या प्रयोगाच्या सिद्धतेमधे कोणी देव, देवदूत वा दैत्य लुडबूड करणार नाहीत असं मी मानतो. आणि माझ्या व्यावसायिक कारकिर्दीमधे मला जे काही यश मिळालं त्याने माझ्या या धारणेला पुष्टी मिळाली आहे. तेव्हा माझ्या इतर व्यावहारिक आचरणामधे जर मी निरीश्वरवादी राहिलो नाही तर तो बौद्धिक अप्रामाणिकपणा ठरेल.
तरी सुद्धा अनेक वैज्ञानिक स्वतःला ख्रिश्चन किंवा इतर कोणत्यातरी धर्माचे अनुयायी म्हणवतात. हे असं का?
आपलं विज्ञानाच्या क्षेत्रातील काम करीत असताना वैज्ञानिक विवेकवादी असतात आणि त्यांच्या कामाशी कोण्या गूढ शक्तीचा संबंध आहे असं ते अजिबात मान्य करीत नाहीत. परंतु रविवार उजाडला की किंवा धर्माबाबत विषय निघाला की ते बरोबर उलट्या दिशेला फिरतात. म्हणजे त्यांना असंच म्हणायचं असतं की, ‘सर्वच गोष्टींना तार्किक कायदे लागू करता येत नाहीत; मी माझी श्रद्धा जपतो.
याला काही सरळ सोपं उत्तर नाही. लॉरेन्स क्रॉस दोन कॅथॉलिक अस्तित्ववादींशी चर्चा करीत असताना त्याच्या लक्षात आलं की ते दोघे अखेरीस ‘कौमार्यावस्थेत जन्म ही घटना शब्दशः मानायची नसते या मुद्यापर्यंत येतात. हे मूलतत्त्ववादींना (त्या अस्तित्ववादींनी) सांगायला हवं. तसं आता बहुतांश लोकांना आपण विवेकवादी असायला हवं हे पटतं. म्हणून आधुनिक ख्रिश्चनांना बायबलमधल्या कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या गोष्टीवर ठेवायचा नाही याची निवड करावी लागते. ही निवड ते कशी करतात? चर्च किंवा एकूणच बायबलची शिकवण यामधून या प्रश्नांची उत्तरं मिळतात. आणि ती अवलंबून असतात तुम्ही कोणाबरोबर चर्चा करीत आहात, धर्म कोणता आहे, चर्चेला संदर्भ काय आहे यावर. एखाद्या विवेकवादी (श्रद्धाळू नसलेल्या) वैज्ञानिकाला या साèयाच संकल्पना अगदी परक्या वाटतात; कारण विज्ञान खरोखरच धर्माशी विसंगत आहे.
याबाबत पी झेड मायर्स आपल्या ‘फॅरिंगुला ब्लॉगमधे म्हणतात, ‘धर्म म्हणजे एक उत्तरांचा साठा आहे; आणि त्याहिपेक्षा वाईट म्हणजे धर्म निरुपयोगी कर्मकांडांचा संच आहे. आणि हेच तर आमच्या ‘धर्म आणि विज्ञान विसंगत आहेत ह्या प्रतिपादनाचं मूळ आहे.
‘धर्म वेगवेगळी उत्तरं देत राहतो. अगदी असंबद्ध उत्तरं! ती सगळीच बरोबर असणं शक्य नाही. आणि भरीला कोणतेही दोन वेगळे धर्म प्रश्नाचं तेच एकमेव उत्तर देत नाहीत. प्रश्न तोच असला तरी प्रत्येक धर्माचं उत्तर वेगळं. पण विज्ञानात मात्र कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरावर साधारणतः एकमत होत असतं. आणि ते उत्तरही वारंवार बदलणारं नसतं. त्यामुळे धार्मिक आणि वैज्ञानिक उत्तरांमधलं कोणतं बरोबर हे मी नीट जाणतो. मग धर्म सरळ सरळ खोटा ठरतो.
विज्ञान आणि ईश्वर यांच्यामधल्या विसंगतीविषयी आपल्याला एवढी चिंता कशाला करायला हवी? करायला हवी, कारण हे जग जर श्रद्धेऐवजी विवेकावर अवलंबून चाललं तर जीवन जगणं सुकर होईल. लेखाच्या अखेरीस क्रॉस म्हणतात, ‘सध्या इराणमधे उत्पन्न झालेल्या पेचप्रसंगामुळे विवेकाधारित जग आणि कर्मठधर्माधारित जग यांच्यातील ढळढळीत विसंगती उघड झाली आहे.
‘मानवी व्यवहारामधे तसेच इतर भौतिक जगामधे विवेकच योग्य मार्गदर्शक आहे हे सूर्यप्रकाषाएवढं स्वच्छ सत्य सांगणं हेच विज्ञान आणि धार्मिक तत्त्वप्रणाली यांच्यातील विसंगतीच्या निःपक्षपाती मूल्यमापनाचं योगदान असावं!
लॉरेन्स क्रॉस