पशुबळी

धार्मिक जत्रा: महाराष्ट्रात उन्हाळ्यामधे सर्व खेड्यापाड्यातून कोणत्या ना कोणत्या देवाची अगर देवतेची जत्रा भरत असते. या जत्रा म्हणजे एक सामुहिक करमणुकीचे आणि सर्व गावकèयांनी एकत्र जमण्याचे एक साधन असते. यामधे पशुबळी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. पुराण काळातील मानवी रानटीपणाचेच पशुबळी हे द्योतक आहे. पण यामधे व्यापारी हितसंबंधही गुंतलेले असतात. हे लोक अशा उत्सवांना धार्मिक आणि सांस्कृतिक रूप देवून त्याचे महत्त्व वाढवतात त्यातून स्वतःची तुंबडी भरणं सोपं होतं.

प्रत्येक खेड्याची आपापली देवता अगर देव असतो. आणि त्याची पूजा केल्यावर वर्षभर तो देव गावाचे आणि गावकèयांचे संकटापासून संरक्षण करतो असा त्यांचा समज आहे. पिढ्यांपिढ्या चालत आलेल्या रूढी मनोभावे पाळल्या तर आपल्यावर संकट येत नाही असं हे लोक समजतात. यातीलच एक दुष्ट रूढी म्हणजे पशुबळी देणं. साधारणपणे कोबड्याचा किंवा बकऱ्यांचा  बळी दिला जातो; पण क्वचित एखादा धष्टपुष्ट रेडाही बळी म्हणून कापला जातो. बळीच्या मासाचा एक तुकडा देवाला, काही भाग पुजाऱ्याला आणि उरलेल्या भागाची स्वतःच्या कुटुंबासाठी व आप्तेष्टांसाठी मेजवानी होते. ह्या सर्व कृतीला नवस फेडणं असं म्हटलं जातं.

मुळात देवाला आपण काही दिलं तर देव आपली काळजी घेईल हा समजच चुकीचा आहे. यामुळे गोरगरीब लोकांना सुद्धा औषधोपचार, सकस आहार योग्य कपडे आणि मुलांचे शिक्षण या गोष्टींऐवजी भलत्याच गोष्टींवर अनाठायी खर्च करावा लागतो. शिवाय हे बळीचे मास प्रसाद म्हणून शिजविले जाते ती पद्धत अत्यंत अस्वच्छ असते. या पशुबळींवर खर्च होणारी लाखो रुपयांची  रक्कम अत्यंत गरज असलेली अधःसंरचना उभारण्यासाठी, गरीबी हटविण्यासाठी आणि शिक्षणासाटी वापरता येईल.

महाराष्ट्र अंनिसचे प्रयत्न:

पशुबळी प्रथेविरुद्ध अंनिसने चालविलेल्या प्रचारमोहिमेमधे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ज्यांचा उदरनिर्वाह या प्रथांवर अवलंबून असतो, ते लोक या प्रचाराचं श्रेष्ठ उद्दिष्ट आणि प्रामाणिक प्रयत्न नाकारून त्याला कडाडून विरोध करतात. स्थानिक गुंड अंनिसच्या कार्यकर्ताचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी धमक्या देतात. त्यांनी लावलेली पोस्टर्स त्या धार्मिक भावनांना ठेच पोचविणारी आहेत असा आरोप करून ती लावण्यास आक्षेप घेतात. पुजाऱ्याचे हे बगलबच्चे स्थानिक तरुणांच्या झुंडींना चिथावतात आणि झपाटल्यासारखे वागायला लावतात.

पशुबळी प्रथेचा समाजास आर्थिक किंवा मानसिक दृष्ट्या काहीच उपयोग नसल्याने अंनिसने त्याला सातत्याने विरोध केला आहे. न्यायालयांनीही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी पशुबळी देणे थांबविण्याचे आदेश दिलेले असूनसुद्धा त्यांचा हुकूम अमलात आणणे पोलिस अधिकाऱ्यांना शक्य होत नाही कारण असं करण्यास समाज पाठिंबा द्यायला तयार नाही. अंनिस या बाबतीत व्याख्याने, पोस्टर्स, प्रदर्शनं, मिरवणुका, निदर्शनं याद्वारे लोकांना शिक्षण देवून त्यांच्यात जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.