भूत

भारताच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या लोकवांग्मयामधे भुतांच्या गोष्टींना फार महत्त्व आहे. जुन्यानव्या परिकथांमधे भुतांच्या कल्पना असतातच. पौराणिक आणि वेदिक साहित्यांमधेही भुतांचा उल्लेख अनेक ठिकाणी असतो. गरुडपुराणामधे भुतांविषयी बराच तपशील दिलेला आहे. भुतांच्या अस्तित्वाचा पुरावा नेहमीच तथाकथित, ऐकीव असला तरी भुतांच्या अस्तित्वाबाबतची खात्री मात्र इतिहास काळापासून आजतागयत सर्वत्र दिसते.

भूत म्हणजे एखाद्या प्राण्याचं, विशेषतः माणसाचं अभौतिक मूर्तरूप किंवा सारतत्त्व (इसेन्स). केव्हा केव्हा त्याला आत्माही म्हटले जाते. ज्या माणसांना अपघाती मृत्यू येतो किंवा ज्यांच्या आशा-आकांक्षा अतृप्त राहिल्या असतात ती माणसे मरणोत्तर भुते बनून पृथ्वीवरच राहतात. अनेक वेळा मृतव्यक्तीच्या आभासी आकृतीलाही भूत म्हटले जाते. ही आकृती कधी कधी एखाद्या ढगासारखी विरळ तर कधी अगदी मृत व्यक्तीची हुबेहुब मूर्ती असू शकते. भुतांचे वेगवेगळे प्रकार मानले आहेत. स्त्रीच्या भुताला हडळ म्हणतात. अवाहित तरूण मुलग्याच्या भुताला मुंजा म्हणतात.

भुते म्हणजे अतृप्त आत्मे:  या समजाचं मूळ qहदूंच्या जीवात्मवादामधे (अॅनिमिझम -सर्वजीववाद) असावं. यानुसार सर्व सजीव व निर्जीव वस्तूंमधे आत्मा असतो असे मानण्यात येते. माणसाच्या आतील आत्मा (छोटा माणूस) त्याला जिवंत ठेवतो त्याच्या हालचाली घडवतो. आत्मा म्हणजे त्या माणसाची हुबेहुब प्रतिकृती, अगदी त्याच्या कपड्यांसकट असा समज असतो.  माणसाला दिसणाऱ्या भुतांच्या आकृती त्याच्या समाजाचे समज-गैरसमज आणि त्याच्या स्वतःच्या धारणा आणि पूर्वग्रह यावर अवलंबून असतात.

भुतांबाबतच्या कल्पना: लोककथांमधे भुतं बहुधा रस्त्यातील एकाकी जागा, खेड्यांमधली मैदाने, निर्मनुष्य घरे, विहिरी इत्यादी जागा दहनभूमी, स्मशाने, कबरस्थाने , वड-पिंपळ अशी झाडे अशा ठिकाणी असतात. त्यांची पावुले उलटी असतात. त्यांना डोके नसते व त्यांचे डोळे छातीवर असतात. त्यांची सावली पडत नाही.त्यांचे प्रतिबिंब कोणाला दिसत नाही. ती बंद खोलीतही शिरू शकतात. ती आसपास उपस्थित असल्यास जोराचे वारे वाहतात व हवेत खूप गारवा वाटतो. ती काही लोकांनाच दिसतात, सर्वांना दिसत नाहीत आणि संशयवादींना तर अजिबात दिसत नाहीत. लोककथांमधे रंगविलेली भुते नेहमी दुष्ट असतात. आधुनिक कथा-कादंबऱ्या आणि फिल्म्स मधे उपकारक भुते दाखवली जातात.

युक्तिवाद:

मानवी आकलनशक्तीच्या मर्यादा : आपण दोन प्रकारच्या भुतांची कल्पना करू शकतो. एक ढोंग किंवा कल्पित भूत आणि दुसरं मानसिक आजारामुळे भासू लागलेले. फसवणुकीसाठी भुताचा आव आणून किंवा मनामधे खोल रुजलेल्या कल्पनांच्या प्रभावामुळे, किंवा कोणीतरी केलेल्या प्रभावी सूचनांमुळे किंवा केवळ आभासामुळे कल्पित भूत आकार घेतं. प्रत्यक्ष भूत पाहिल्याच्या दाव्यांबद्दल आधुनिक टीकाकार म्हणतात की मानवाला होवू शकणाऱ्या बोधाच्या मर्यादा आणि इतर भौतिक कारणांनी ह्या दाव्यांचं स्पष्टीकरण करता येतं. हवेच्या दाबामधे होणाऱ्या बदलांमुळे दारं धडाधड आपटू शकतात; बाहेर धावणाऱ्या गाड्यांचा प्रकाश खिडकीतून परावर्तित होवू शकतो. असल्या यादृच्छिक बोधांमधेही काहीना काही आकृतीबंध शोधणं ही माणसाची उपजत प्रवृत्ती असते. त्यामुळेही भुते पाहिल्याचा आभास होवू शकतो. माणसाची परिधीय दृष्टी (पेरिफेरल व्हिजन) हे डोळ्याच्या कडेला भूत दिसण्याचं कारण असू शकतं. ही दृष्टी खूप संवेदनशील असते आणि विशेषतः रात्रीच्या वेळी जेव्हा मेंदू थकलेला असतो त्यावेळी आवाज आणि दृश्य यांचा अगदी सहजपणे चुकीचा अन्वयार्थ लावला जातो. एखादी जागा भुताने पछाडलेली आहे असा आपला पक्का समज झालेला असतो आणि तिथे घडणाèया अगदी साध्या दैनंदिन गोष्टींना सुद्धा आपण भुताने पछाडल्याचा पुरावा मानतो.

वेगवेगळे आवाज हे पण भुतं दिसण्याचं(दिसल्याचा भास होण्याचं) एक कारण आहे. २० हट्र्झच्या पेक्षा कमी कंपनसंख्या (फ्रिक्वेन्सी) असल्यास त्याला अवश्राव्य (इंफ्रासॉनिक) म्हणजे ऐकू न येणारा ध्वनी म्हणतात. परंतु अशा ध्वनीमुळे माणसाला खोलीत बसल्याबसल्या चिंता वाटणं, अतीव दुःख किंवा हुडहुडी भरल्यासारखंही वाटू शकतं. कार्बन मोनॉक्साइड मुळे आपले डोळे आणि कान यांची संवेदन क्षमता बिघडू शकते आणि भुतांचा भास होवू शकतो. आभास होणं (हॅल्युसिनेशन) सुद्धा भूत दिसण्याचं कारण असू शकतं. भूचुंबकीय (जिओमॅग्नेटिक) बदलांमुळे कुंभखंड (टेम्पोरल लोब्ज) म्हणजे मेंदूचा कपाळातील भाग उत्तेजित होवून भुतांचे आभास होतात.

भुतांच्या अस्तित्वावरील विश्वासामुळे होणारे नुकसान: या विश्वासामुळे माणूस विचित्र विचार आणि वर्तन करतो. हे विचार सतत मनात घोळत राहिल्याने त्याच्या मनात तणाव आणि भीती घर करून राहतात. जिथे भूत असल्याचा समज असतो त्या जागेविषयी अनेक आफवा पसरतात आणि ती जागा निर्मनुष्य बनते. किंवा मग पूजाअर्चेचं स्थान बनते. यातून भानामतीसारख्या घटना घडू लागतात. परिसरातल्या वस्तू इकडून तिकडे हलू लागतात. यामागे कोणीतरी पौगंडावस्थेतील मुलगी असते, जिला मानसिक आधार हवा असतो, इतर कुटुंबियांकडून विचारपूस व्हावी अशी प्रबळ इच्छा असते.  भूत उतरविणं ही एक धार्मिक-अध्यात्मिक श्रद्धेची बाब असते आणि जादूटोण्यासारखा विधीही असतो. एखाद्या जागचे भूत हटवून ती जागा पुन्हा निर्दोष करण्याचे दावे नेहमी खोटे ठरले आहेत. (भूतच अस्तित्वात नसल्याने ते घालविणे अशक्य.)

याविरुद्ध अंनिसची उपाययोजना:

अंनिसने भूत असल्याचा दावा करणाऱ्यांना आव्हान दिले आहे. जो कोणी भूत असल्याचे वैज्ञानिक कसोटीनुसार सिद्ध करून दाखवील त्याला भरघोस पारितोषिकही जाहीर केले आहे. भुतांची भीती लोकांच्या मनातून नाहीशी होण्यासाठी जिथे भुतांच्या अफवा जास्त असतात अशा ठिकाणी जावून जनजागृती करण्याचे कार्यक्रम अंनिस सतत राबवीत असते. भूत या संकल्पनेविषयी वैज्ञानिक आणि चिकित्सक विश्लेषण करणारे भरपूर साहित्य अंनिसने प्रसिद्ध केले आहे.