बुवाबाजी

अंनिसच्या एका अलिकडच्या वार्तापत्राच्या अंकामधे हल्ली होत असलेला अंधश्रद्धांच्या वाढत्या प्रसारावर चार लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यामधे वर्णन केलेल्या, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागांमधे फोफावत असलेल्या या अंधस्रद्धांच्या घटना ‘जादुटोणा आणि तत्सम अघोरी इलाज आणि प्रथा यांच्याविरुद्ध त्वरित कायदा करण्याची किती गरज आहे हे स्पष्ट करतात. त्या घटना बघू या.

एका शिक्षकाची गोष्ट :

रायभान टेंभुर्णे हे या शिक्षकाचं नाव. टेंभुर्णे हे भंडारा जिल्ह्यातलं एक गाव आहे. रायभानला तीन मुली होत्या-थोरली रत्ना २० वर्षाची, कॉलेजमधे; सोळा वर्षाची अमिता बारावीत आणि तेरा वर्षाची सीमा हायस्कूलमधे शिकत होती. तसं हे कुटुंब सुखी होतं. खेड्यातल्या लोकांशी रायभानचं सूत जमलं होतं. परंतु त्याला काही मानसिक व्यथा होत्या  आणि त्यासाठी नागपूरला इलाज चालू होता. त्याच्या एका मित्राने त्याला सुचविले की त्याने नंदिनीला-एका मांत्रिक स्त्रीला-भेटावे. नंदिनी वारंवार होणारी दुखणी, कावीळ, चेटूक आणि भूतबाधा यावर इलाज करण्याबाबत प्रसिद्ध होती. तिला दैवी शक्ती मिळाली होती असा सर्वांचा समज होता. तिच्या इलाजाने रायभानही प्रभावित झाला. तो सत्ययुग या पंथाचा कट्टर अनुयायी होता. (हा पंथ विश्वकल्याणासाठी झटत असतो.) त्याने नंदिनीला त्याच्यासोबत सत्ययुग पंथामधे येण्याची विनंती केली. नंदिनीही आपल्या नवèयाला सोडून रायभानबरोबर त्याची दुसरी पत्नी होवून गेली. तिने रायभानच्या कुटुंबियांना आणि खेड्यातल्या सर्व लोकांना आपल्या अंगात येणाèया देवीच्या धाकाखाली ठेवलं. सारे तिला माताजी म्हणू लागले. घरातील लोकांवर तर तिने आपल्या वागण्या-बोलण्याने जादूच केली होती. धाकट्या मुलीने शाळा सोडून दिली. घरामधे कोणी आजारी पडलं तरी माताजी योग्य औषधोपचार होवू देत नसे. आजार ही ‘बाहेरची बाधा‘ असते आणि त्यातून रुग्णाची सुटका करण्याची दैवीशक्ती केवळ तिलाच प्राप्त झाली आहे असा तिचा दावा होता.

पण एकदा मोठी मुलगी रत्ना आजारी पडली. माताजींनी आपल्या दैवी शक्तीचे इलाज सुरू केले. पण रात्री रत्नाचा मृत्यू झाला. जवळच्याच एका प्लॉटमधे रायभानने रत्नाचा देह त्या प्लॉटच्या मालकाच्या विरोधाला न जुमानता पुरला. रत्नाच्या मृत्यूची बातमी आणि त्यासोबत अफवा गावभर पसरल्या. मुलीचा बळी देवून नंदिनी पुत्रप्राप्ती करून देईल या आशेने रायभानने आपल्या मुलीला मारून टाकले असा लोकांचा समज झाला.संतप्त झालेल्या लोकांना रायभानच्या संपूर्ण कुटुंबालाच देहदण्ड द्यायचा होता. पोलिसांनी मध्यस्थी करून लोकांना आवरले. लोकांनी तगादा लावल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह दवाखान्यात नेण्यात आला. लोकांनी जिथे रत्नाला पुरले होते त्या जागी नारळ, फुले, फळे एत्यादी वस्तू उत्स्फूर्तपणे आणून ठेवल्या. पोलिसांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे साèया कुटुंबाची हत्त्या टळली. पुढे सर्व कुटुंबियांना अटक करून कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

अशा घटना सर्रास घडतच असतात. आणि गुन्हेगार मोकाट हिंडत असतात. या घटनेतील गुन्हेगार सुद्धा कायद्यातील पळवाटांमुळे शिक्षा न भोगता सुटतीलही!

सुफी  सिकंदर शहा :

महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील जालना जिल्हा मागासलेला आहे. तेथे शिक्षण नाही, इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा नाहीत. ह्यामुळेही कदाचित तिथे बाबाबुवा, महाराज, देव्या यांचं पीक आलेलं असतं. अगदी उघडं तर कधी छुपं. त्यांच्यापैकीच एक सुफी सिकंदर शहा जे स्थानिक वृत्तपत्रामधे आपली जाहिरात करीत असंत. जाहिरातीचा सारांश असा: सुफी बाबा त्यांच्याकडे जाणाया ‘भक्ताचंङ्क नशीब बदलून देतात. ह्याचा २२ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. व्यवसायातील तोटा, लग्नातील विघ्न, कौटुंबिक समस्या, मूलबाळ नसणं, भूतबाधा, जुनाट व्याधी, व्यसनमुक्ती, जोम इत्यादींच्या बाबतीत ७६ तासात त्यांच्या आशिर्वादाचं फळ दिसू लागतं. त्यांनी मंतरलेला ताईत बांधा; तुमच्या समस्या ताबडतोब दूर होतील. आपल्या ४-५ अनुयायांसोबत एका हॉटेलमधे राहून ते आपला धंदा तेजीत चालवीत. २५-२६ वर्षांंच्या या माणसाला २२ वर्षाचा अनुभव कसा असू शकेल असा कोणालाही प्रश्न पडला नाही. ते आपल्या बैठकीत हिंदु देवदेवता, शिरडीचे साईबाबा, आणि मुस्लिम साधुसंतांची चित्रे ठेवीत.

या सुफी संताचा पर्दाफाश करायचं अंनिसच्या कार्यकत्र्यांनी ठरविलं. एका स्टिंग ऑपरेशनचं नियोजन करण्यात आलं. दोन कार्यकर्ते एका जोडप्याच्या रुपामधे सूफीबाबाकडे गेले आणि आपल्याला मूलबाळ नसल्याची तक्रार केली. शहाने त्या स्त्रीला एकट्याने तपासावे लागेल असे सांगितले. तपास करताणा त्याने तिची साडी सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु दक्ष असलेली कार्यकर्ती काहीतरी कारण सांगून बाहेर आली. तिथल्या हजर असलेल्या कार्यकत्र्यांना आणि जमलेल्या लोकांना तिने झालेला सर्व प्रकार सांगितला. ते शहा यांना पुन्हा भेटले तेव्हा शहांनी पुत्र प्राप्तीसाठी काही कर्मकांडं करण्यास सांगितली आणि काही खया-खोट्या गोष्टी सांगून श्रोत्यांवर छाप मारण्याचा प्रयत्न केला. ती कर्मकांडं पार पाडण्यासाठी तिने एकटीनेच यावे हे तो वारंवार सांगत होता. कार्यकत्र्यांची एक टीम, स्थानिक पोलीस आणि टीव्हीचे लोक त्याच्या खोलीत घुसले आणि त्याला समोर उभे ठाकले. आता सूफी बाबाचे पाय लटपटायला लागले. चौकशी सुरू होताच बाबांनी सर्व काही कबूल करून टाकलं. अंनिसचे दक्ष असलेले कार्यकर्ते, पोलीस आणि जागृत झालेली जनता या सर्वांच्या सहकार्याने आज बाबा आणि त्याचे हस्तक जेलमधे खटल्याच्या निकालाची वाट बघत बसले आहेत.

 क़ुंडलिनी बाबा:

गोव्यातल्या मडगाव येथे असलेल्या एका आध्यात्मिक केंद्रामधे सिद्ध रामेशजी चौहान यांनी एक चार दिवसांचं शिबीर घेतलं. कुंडलिनी जागृत करणाèया या महान अतिथीचं गोवेकरांना केवढं अप्रूप होतं! कुंडलिनी जागृत झाली म्हणजे आरोग्य, मनःशान्ती आणि आध्यात्माचं ज्ञान मिळतं. या शिबिरासाठी जी पत्रकं वाटली गेली त्यामधे कुंडलिनीचे फायदे वर्णन केले होते, ‘या कुंडलिनी जागृतीमुळे मनातील सर्व वाईट विचार, मत्सर, वाईट सवई आपल्या आयुष्यातून नाहिशा होतील. शांभवी क्रियेने रोगनिवारण आणि अलौकिक शक्ती प्राप्त होतील. गणेशक्रियेने सर्व मंत्र-तंत्रांच्या प्रभावापासून सुटका होईल. आणि यापुढे त्यांचा त्रास होणार नाही. मूत्रपिंड , हृदय, कर्करोग, रक्तदाब, एडस,ट्यूमर इत्यादी विकारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींना तुरंत आराम पडेल. जास्त माहिती मिळविण्यासाठी फोन नंबरही पत्रकात दिला होता. कार्यक्रम पूर्णपणे विनाशुल्क होता परंतु त्यानंतर ‘कन्सलटेशनङ्कची गरज असल्यास प्रतिदिन ३००० रुपये खर्च येईल.

अंनिसच्या स्थानिक कार्यकत्र्यांनी त्यांच्या पहिल्यादिवशीच्या व्याख्यानाला हजेरी लावली. केन्द्राच्या प्रमुखांनी चौहान यांची ओळख करून दिली. चौहन मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांचे सहा कारखाने आहेत. करोडोपती असून सुद्धा सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेने ते गोवेकर श्रोत्यांचं जीवन सुखी व्हावं म्हनून हा कार्यक्रम राबविण्यास आले आहेत. वगैरे वगैरे. व्याख्यान आणि कुंडलिनीचे प्रात्यक्षिक दाखवून झाल्यावर अंनिसच्या कार्यकत्र्यांनी त्यांना कुंडलीनीविषयी प्रश्न विचारले.

‘‘आध्यात्मिक प्रवृत्तीचा माणूस सहसा स्वतःची स्तुती केलेली पसंत करीत नाही. आपण मात्र आपली इथे होत असलेली स्तुती ऐकून घेतली; त्यास आडकाठी केली नाही. असे का? उत्तराप्रीत्यर्थ बाबा काहीतरी पुटपुटले. ते कोणालाच ऐकू गेले नाही. एका कार्यकत्र्याने सुचविले की चौहानगुरुजींनी मूकबधीरांच्या शाळेत जावून त्यांच्यावर कुंडलिनी जागृतीचा इलाज करावा.

दुसरा प्रश्न होता, ‘गुरुजी आमचे लोक विठ्ठल, पांडुरंग, गणेश, मंगेश अशा अनेक देवदेवतांचे परम भक्त आहेत. आणि या देवतांच्या आशिर्वादाने सुखाने जगत आहेत. देवाचा आशिर्वाद असतांना या कुंडलिनीला जागृत करण्याची काय गरज? चौहान गुरुजी गप्पच राहिले.

‘‘गुरुजी ज्ञानेश्वरीमधे असं  म्हटलं आहे की कुंडलिनी जागृत झालेल्या माणसाला समुद्रापलिकडचेही दिसते. आपण आपल्या मागे असलेल्या पडद्याआड काय आहे ते सांगू शकाल का? या प्रश्नाने गुरुजी रागावले, ‘‘तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला अलौकिक शक्ती प्राप्त नाहीत का? यावर गुरुजींचे चेले आरडा ओरडा करू लागले, ‘‘आम्हाला गुरुज़ींचं बोलणं ऐकायचं आहे; तुमचे फालतु प्रश्न आणि त्याची उत्तरं नाहीत.” मग त्यांनी पत्रकार टीव्ही च्या कॅमेरामनवर हल्ला करायला सुरुवात केली. एकाने स्थानिक वृत्तपत्राच्या वार्ताहराचा कॅमेरा हिसकावून घेतला. मग पोलिसांनी मधे पडून दोन्ही पक्षांना शांत केले. आणि या गोंधळातच कार्यक्रम संपला.

ही असली शिबिरे, व्याख्याने, कार्यशाळा इत्यादी भोंगळ कार्यक्रम आयोजित करण्याचे सध्या खूळच माजले आहे. मोठमोठे दावे करून आणि विचित्र पद्धतीने सुख आणि मनःशांती मिळविण्याची आश्वासनं दिली जातात. ही सारी उपदेश आणि मार्गदर्शन करणारी केन्द्र म्हणजे सुशिक्षित/अशिक्षित लोकांना फसवून गल्ला जमा करण्याचा उद्योग असतात. आणि यांना आळा घालण्यासाठी आपल्याकडे काहीही उपाय उपलब्ध नाहीत.

कोल्हापूरचे निवृत्ती:

कोल्हापूरचे निवृत्ती रामचंद्र चौगुले हे मध्यम वयाचे गृहस्थ स्वेच्छानिवृत्ती घेवून आता एक  कौटुंबिक मार्गदर्शन केन्द्र चालवीत आहेत. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मधल्या त्यांच्या गावाच्या आसपासच्या खेड्यांमधे ते एक दैवी शक्ती असलेले बाबा बनून रूहिले आहेत. जुनाट आजार बरे करण्यासाठी ते जादूटोणा आणि चेटुक यांचा अवलंब करतात अशी आसपास अफवा आहे. कोणत्याही कौटुंबिक समस्येवर ते आपल्या अलौकिक शक्तीने तोडगा काढू शकतात. त्यामुळे त्यांचा सल्ला घेण्यासाठी लोकांची गर्दी जमत असे आणि त्यांना लोक स्वतःच्या घरीही बोलावीत असत.

कोल्हापूरजवळच्या तामगाव नावाच्या खेड्यातल्या एका स्त्रीने त्यांना घराच्या वास्तुशांतीसाठी बोलावले. ही पूजा चालू असतांना निवृत्तीबुवांनी तिला नवीन घरात सुखशांती लाभावी म्हणून लैंगिक संबंध करण्यास सांगितले.  ती स्त्री भांबावून गेली आणि तिने ही गोष्ट नातेवाईकांना सांगितली. ते अर्थातच संतापले आणि ही बातमी गावभर पसरली. संतप्त गावकरी जमा झाले आणि जे हाती लागेल ते घेवून निवृत्तीबुवांना झोडपू लागले. त्यांचे कपडे फाडले आणि त्यांना जोड्याचा हार घालून त्यांची धिंड जवळच्या पोलिस ठाण्यावर नेली.

पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं  परंतु गावकरी त्यांना मारून टाकायलाच निघाले होते. त्यांच्या लंपटपणासाठी त्यांना मृत्यूदंडच  द्यायचा होता. या असल्या घटना काही विरळा नसतात. त्या खेड्यापाड्यातून वारंवार घडत असतात. परंतु या घटनांना सन्सनाटी बातमीचे मूल्य नसल्याने माध्यमं त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. घटना भयानक परिणाम घडविणाऱ्या असल्या तरच त्यांच्याकडे वृत्तपत्रांचे लक्ष वेधते. कायदेही तुटपुंजे अस्ल्याने पोलीसही याबाबतीत योग्य ती कारवाई करू शकत नाहीत.

दैवी चमत्कारांच्या गैप्यस्फोटाची मोहीम:

डॉ. कोवूर यांनी भारतामधे १९६० ते १९७० च्या दशकामधे जी दैवी चमत्कारांच्या गौप्यस्फोटाची मोहीम काढली होती तिला तोड नाही. आपल्या टीमच्या सदस्यांसमवेत ते थेट नावाजलेल्या बाबाबुवांच्या आड्ड्यावरच धडक देत असत. अनेक दशके लोकांना भुरळ पाडून लुबाडणारे भारतातील एक नंबरचे ठक सत्यसाईबाबा यांना कोवूरांनी दिलेली धडक भेट केवळ अविस्मरणीय आहे. कोवूरांनी आपल्याला भेट मिळावी म्हणून त्यांना अनेक पत्रे लिहिली, पण साईबाबांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. मग त्यांनी बाबांना सांगितलं की ते त्यांना बंगलोरच्या व्हाईट फील्ड येथे भेटायला येतील. कोवूर तिथे पोचायच्या आत बाबा तिथून पळाले आणि आपल्या पुट्टपार्थीच्या आश्रमात जावून लपले.

कोवूर यांच्या मोहिमांमुळे भारतातील बुद्धिप्रामाण्यवादी चळवळींच्यात नवा उत्साह संचरला. देशाच्या विविध भागांमधे अनेक संशयवादी संघ निर्माण झाले. भारतातील बुद्धिप्रामाण्यवादी, संशयवादी आणि विवेकवादी चळवळी कोवूर यांना त्यांच्या मोहिमा, चळवळी, व्याख्यानं आणि लेख यासाठी सदैव रुणी राहतील .

अब्राहम कोवूर यांचे आव्हान:

मी अब्राहम कोवूर, राहणार -‘तिरुवल्ला, पामणकडा लेन, कोलंबो ६, असं जाहीर करतो की मी, जगातल्या कुठल्याही कानाकोपèयातला जो कोणी इसम वैज्ञानिक कसोटीच्या सर्व अटी पाळून आपल्या अलौकिक किंवा चमत्कार पूर्ण शक्तीचं प्रात्यक्षिक करून दाखवील त्या कोणालाही  १००,००० स्रीलंकन रुपये बक्षीस म्हणून द्यायला तयार आहे. हे इनाम मी हयात असेपर्यंत किंवा मला पहिला विजेता सापडेपर्यंत राखून ठेवले जाईल. जे बाबाबुवा, साधुसंत, योगी, सिद्धपुरूष  आपल्याला आध्यात्मिक तपस्येतून अलौकिक शक्ती प्रापत झाली असल्याचा आणि दैवी कृपा असल्याचा दावा करतात त्यांनी खालीलपैकी कोणताही चमत्कार करून बक्षीस मिळवावे.

१. एका सीलबंद पाकिटात ठेवलेल्या करन्सी नोटवरील नंबर बिनचुक सांगणे.

२.  एका करन्सी नोटची हुबेहुब प्रतिकृती बनवणे.

३   पायाच्या तळव्याला फोड न येता धगधगत्या निखाèयावर अर्धा मिनिट निश्चल उभे राहून दाखविणे.

४.  मी सांगेन ती वस्तू हवेतून काढून दाखविणे.

५.  सायकोकायनेटिक पॉवरचा वापर करून एखादी घन वस्तू हलवून अगर वाकवून दाखविणे.

६. टेलिपथीचा उपयोग करून दुसऱ्यांचा मनातील विचार ओळखणं.

७. प्रार्थना, श्रद्धा, अलौकिक शक्ती, मंतरलेलं पाणी, विभूती इत्यादीच्या सहाय्याने शरिराच्या कापून टाकलेल्या अवयवाची एक इंच एवढी तरी वाढ करून दाखविणे.

८. योगिक शक्तीचा वापर करून स्वतःचं शरीर जमीनीपासून वर अधांतरी ठेवून डाखविणे.

९. योगिक शक्तीने हृदयाचे ठोके पाच मिनिटांपर्यंत थांबविणे.

१०. योगिक शक्तीने श्वासोश्वास अर्धा तास थांबविणे.

११. पाण्यावर चालणे.

१२. भविष्यातील एखाद्या घटनेचे भाकित करणे.

१३. शरीर एका जागी सोडून दुसऱ्या ठिकाणी प्रकट होणे.

१४. सर्जनशील प्रज्ञा विकसित करणे किंवा ट्रान्सिंडेंटल/योगिक मेडिटेशनने प्रबुद्ध बनणे

१५. पुनर्जन्मामुळे माहीत नसलेली परदेशी भाषा बोलणे किंवा अंगामधे भूत किंवा देवी आणून दाखविणे.

१६. फोटो काढता येईल असे भूत अगर आत्मा आणून दाखविणे.

१७. फोटो काढल्यानंतर फोटोच्या निगेटिव्हमधून नाहिसे होवून दाखविणे.

१८. कुलूप घालून बंद केलेल्या खोलीतून अलौकिक शक्तीच्या सहाय्याने बाहेर येवून दाखविणे.

१९. अलौकिक शक्ती वापरून एखाद्या वस्तूव्या वजनामधे वाढ करून दाखविणे.

२०. लपवून ठेवलेली वस्तू ओळखणे.

२१. पाण्याचे पेट्रोल अगर वाईनमधे रूपान्तर करणे.

२२. वाईनचे रक्तामधे रूपान्तर करणे.

ज्योतिष आणि हस्तसामुद्रिक ही दोन्ही शास्त्रे पूर्णपणे वैज्ञानिक आहेत असे सांगून भोळ्या लोकांना फसविणारे ज्योतोषी आणि हस्तपरीक्षा करणारे सुद्धा जर ते काही दिलेल्या बिनचुक पत्रिकांवरून अगर हस्तमुद्रांच्या ठशांवरून त्या स्त्री/पुरुषाच्या तसेच मृत/जिवंत व्यक्तीच्या आहेत हे (केवळ ५% पेक्षा कमी चुका करून) ओळखू शकले तर हे बक्षीस जिंकू शकतात.  चमत्कार करून दाखविणाèया सत्यसाईबाबा सारख्या अनेक  अलौकिक व्यक्तिमत्व असलेल्या योगी मंडळींना, तसेच ज्यांनी आता पाश्चात्य देशांमधे भोळ्याच पण जास्त पैसेवाल्या लोकांच्यामधे आपले बस्तान बसविले आहे अशा व्यक्तींनाही हे आव्हान देत आहे. त्यांनी माझ्यासारख्या संशयवादीचे हे आव्हान स्वीकारून आपण लबाड नाही हे दाखवून द्यावे.

परिचय: चमत्कार म्हणजे स्पष्ट दिसणारं नैसर्गिक नियमांचं उल्लंघन करणारं कृत्य, ज्याचं स्पष्टीकरण केवळ दैवी हस्तक्षेप असंच करता येईल. असे चमत्कार कोणी तरी मनुष्य करीत असतो. लोककथा, दंतकथा, पौराणिक कथा यांमधे चमत्कारांचे अनेक किस्से बघायला मिळतात. ह्ल्ली तर सिनेमा आणि टीव्ही वरील सिरियल्समधे तर चमत्कार खचाखच भरलेले असतात. लोक आपल्या संस्कृतीनुसार चमत्काराची वेगवेगळी व्याख्या करतात. देव नसलेल्या एखाद्या अलौकिक अस्तित्वाच्या (हेही काल्पनिकच असतं) कृत्याला लोक चमत्कार मानतात. त्याउलट दैवी हस्तक्षेपामधे देवाचीच करणी असते. एखाद्या अपघातातून अथवा दुर्धर आजारातून वाचणं किंवा अगदी अनपेक्षितपणे काही लाभ होणं या असामान्य घटनांनाही पुष्कळ वेळा चमत्कार म्हणतात.

अलौकिक कृत्य: एखाद्या अलौकिक व्यक्तीने नैसर्गिक नियमांचे उल्ल्ंघन करून घडवून आणलेलं कृत्य म्हणजे चमत्कार. अशा अलौकिक कृत्यामागचा तार्किक युक्तिवाद मात्र वेगवेगळ्या तहेचा असतो. बायबल, कुराण आणि हिंदु पुराणं अनेक चमत्कार घडल्याचं सांगत असतात आणि श्रद्धाळू लोक त्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. अनेक धार्मिक पुराणमतवादी असं मानतात की ज्या घटनांचा सयुक्तिक आणि स्पष्ट कार्यकारणभाव देता येत नाही,किंवा त्यांचे स्पष्टीकरण देणारा एखादा वैज्ञानिक सिद्धांत उपलब्ध नसतो त्या घटना अलौकिक शक्तीने घडवून आणल्या हेच सर्वात जास्त सयुक्तिक स्पष्टीकरण आहे. हाच देवाच्या अस्तित्त्वाचा पुरावा आहे.

चमत्कारांविषयीचे दृष्टिकोन: नैसर्गिक जगाच्या व्यवस्थेमधे देवाला काही ढवळाढवळ करता येते असं अॅरिस्टॉटल मानायला तयार नव्हते. बरुच स्पिनोझा त्यांच्या ‘‘थिऑलॉजिको-पोलिटिकल  मधे (ईश्वरशास्त्रीय-राजकीय प्रबंध) म्हणतात,‘चमत्कार ह्या कायद्यानुसार होणाèयाच घटना आहेत; आपण अद्याप त्यांची कारणे जाणू शकलो नाही एवढेच. पण त्यांची कारणे असतच नाहीत असं समजायचं कारण नाही.  डेव्हिड ह्यूम या तत्वज्ञाच्या मते चमत्कार ही दैवी शक्तीने किंवा एखाद्या अदृश्य प्रतोनिधीने घडवून आणलेली, निसर्गनियमांचं उल्लंघन करणारी घटना आहे. अनेक तत्त्वज्ञ असं मानतात की जेव्हा देवाने चमत्कार दाखविला असं मानतात तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की देवाने इतरांना डावलून   एका विशिष्ट व्यक्तीलाच निवडून त्याचा फायदा करून दिला आहे. असा देव पक्षपाती ठरतो. जर देव तुम्हाला तुमच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातातून वाचवू शकतो तर धरणीकंपासारख्या अगर ज्वाला मुखीच्या उद्रेकासारख्या आपत्तीच्या वेळी तो कुठे पेंगत असतो? थोडक्यात सर्वसमर्थ, सर्वसाक्षी आणि सर्वज्ञ देव निसर्गनियमांपुढे हतबल असतो आणि चमत्कार करू शकत नाही.

कल्पनाविलास: चमत्कार घडत नसतात; गोष्टी सांगणाèया सृजनशील व्यक्तींचा तो कल्पनाविलास असतो. आपल्या नायकाला किंवा एखाद्या प्रसंगाला आकर्शक बनविण्यासाठी त्यामधे थोडा दैवविलासही ते ओततात. चमत्कारांमुळे परिस्थिती वास्तवापेक्षा जास्त विशाल बनते आणि घटनेचे महत्त्व वाढते; ऐकणायाच्या भावना उद्दीपित होतात. वास्तव वार्णनाने हे साध्य होत नाही. २१ सेप्टेंबर १९९५ रोजी देवाने दूध पिण्याची जी घटना घडली ती देववादी हिंदूंच्या मते चमत्कारच होती. सगळ्या धर्माचे भाविक लोक अशा अनेक चमत्काराच्या खात्रीलायक घटना घडल्याची ग्वाही देत असतात. प्रत्येक धर्म इतर प्रतिस्पर्धी धर्मांना डावलून आपल्याच धर्माला पुढे दामटत असतो. आणि लोक जितके जुनाट आणि मागास असतात तेवढेच चमत्कार जास्त मानतात आणि त्यांच्यामधे तेवढ्याच अदभूत विभूती मनल्या गेल्याचे दिसते.

विभ्रम (हॅल्युसिनेशन): समूह संमोहन किंवा विभ्रम म्हणजे एखाद्या समूहाला जोरदार सूचना देवून विभ्रमित करणं. धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांच्या भावना उद्दीपित झालेल्या असताना विभ्रमावस्था निर्माण होते. चमत्कार घडतानाचे आपण साक्षिदार असण्याची इच्छा आणि एखाद्या वस्तूकडे अगर जागेकडे खूप वेळ टक लावून पहात बसण्याने काही धार्मिक वृत्तीच्या लोकांना मूर्तीतून अश्रू येत आहेत , पूज्य प्रतिमा अगर मूर्ती हलत आहेत किंवा ढगामधे ईश्वर साक्षात्कार देत आहे असे भास होतात.

मानवाला सर्व जीवांमधे स्वतःचीच प्रतिमा पाहण्याची आणि त्या जीवांना वा वस्तूंना स्वतःला परिचित असलेले व जाणवणारे सर्व गुण चिकटविण्याची खोड असते. आपल्याला चंद्रामधे मानवी चेहरा दिसतो; ढगांमधे सैन्य दिसते; आणि आपल्याला आल्हाददायक वा तापदायक असणाऱ्या त्या सर्व जीवांना वा वस्तूंना बरा-वाईट हेतू चिकटविण्याकडे आपला नैसर्गिक कल असतो- अर्थात अनुभवातून आणि विचारमंथनातून आपण काही शहाणपण शिकलोच नाही तर! ही एक प्रकारची मानसिक विकृती आहे ज्यामधे रुग्ण एखादी अस्पष्ट दुर्बोध अशा संवेदनेला कशाचा तरी स्पष्ट व स्वच्छ संकेत मानतो. पण थोडा सारासार विचार केला तर आपल्याला कळून चुकेल की गणपतीसारखा दिसणारा बटाटा, मदर थेरेसासारखा दिसणारा केक किंवा येशू ख्रिस्तासारखा दिसणारा एखाद्या चपातीचा करपलेला भाग हे निव्वळ योगायोग आहेत आणि कशाचेही संकेत नाहीत.

मानवी स्वभाव: मानवी संस्कृती कितीही विवेकी आणि वैज्ञानिक वृत्तीची झाली तरी चमत्कारावरील श्रद्धेचं निर्मूलन होणं अशक्य आहे. मानवाला स्वभावतःच अद्भुततेचं, चमत्काराचं विलक्षण आकर्षण असतं. अशा गोष्टींचे वा घटनांचे आपण साक्षीदार असावं असं आपल्याला मनापासून वाटतं. आपली कथा जितकी जास्त आश्चर्यजनक तेवढं तिचं व आपलं महत्त्व आणि गुण जास्त. गर्व, संभ्रम आणि धर्मांधता किंवा पक्षांधता यांच्यामुळे अनेक चांगल्या उद्देशाने सुरू झालेली कार्ये किंवा उपक्रम यांच्यामधे चमत्कारांच्या घटनांचा धार्मिक भंपकपणा आणि खोटारडेपणा शिरतो.

आज जरी चमत्कारांवर विश्वास ठेवणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात असले तरी कोणीही आधुनिक इतिहासकार आपल्या ऐतिहासिक लिखाणामधे चमत्कार समजल्या जाणाया घटनांचा समावेश करणार नाही. त्यामधे एकाही चमत्काराला वाव मिळणं अशक्य आहे. जी वर्तमानपत्रे आणि इतर माध्यमे भाविक आणि श्रद्धाळू वाचकांची खास दखल घेतात तीच वृत्तपत्रे आणि माध्यमे चमत्कार मानल्या जाणाèया घटनांचा उल्लेख करण्याचा विचार करतील आणि त्यामधेही त्या घटनेकडे संशयी नजरेने पाहिलेले असेल. आजचे विचारवंत चमत्काराच्या वृत्तांना पूर्ण असत्य किंवा समूह विभ्रम मानतात. पण आपण जेव्हा चमत्कार असूच शकत नाहीत असा ठाम निष्कर्ष काढतो तेव्हा आपला चमत्कारावर विश्वास बसूच शाकत नाही. चमत्कारावर विश्वास असणं हा विवेकपूर्ण आचार नाही; ती केवळ श्रद्धा आहे. श्रद्धेला विवेकाचा आधार लागतच नाही.

चेटुक: महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा विभाग चेटकिणी मारण्याचं केन्द्र म्हटलं जातं. याला डाकीण प्रथा म्हणतात. १९९९ सालानंतर विदर्भामधे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांवर २०० डाकिणींना ठार मारल्याच्या नोंदी आहेत आणि अजूनही ही प्रथा चालूच आहे. विधवा आणि निराधार स्त्रियांवरच बहुधा डाकीण असल्याचा आरोप केला जातो. त्या अगदी हलकीसलकी कामं करून कशाबशा जगत असतात. त्यांची थोडीफार जमीन आणि घर इत्यादी जायदादीवर त्यांच्या नातेवाईकांचा आणि शेजायाचा डोळा असतो. ती हडप करण्यासाठी या स्त्रियांचा निकाल लावणं आवश्यक असतं. त्यांना मारून टाकण्याने किंवा त्यांना गावाबाहेर घालवून देण्याने ही जायदाद त्यांना मिळू शकते.

चेटुक करणारे तांत्रिक-मांत्रिक: प्रार्थना जर दूरवरचा रुग्ण बरा करू शकतात तर दूर असलेल्या माणसाला इजा पोहोचविणंही शक्य आहे असा त्यांचा युक्तिवाद असतो. यज्ञयागासारखी काही कर्मकाण्डे करण्याने त्यांना करणी, वशीकरण यासारख्या काही सिद्धी प्राप्त होतात असा त्यांचा दावा असतो. यांच्यातील पुरुषांना भगत म्हणतात आणि स्त्रियांना चेटकीण म्हणतात. ते आपल्या मंत्राने भयंकर विषारी साप सुद्धा मारू शकतात, तसेच त्यांच्या मंत्राने ते इतरांच्या मनामधे आकर्षण, द्वेश किंवा गोंधळ माजवू शकतात असा ही यांचा दावा आहे.

मानसिक रुग्ण स्त्री किवा अशी स्त्री जिच्यावर अन्याय झालेला असल्याने ती सूडाने पेटून उठली आहे अशा स्त्रिया सहसा चेटकिणी बनतात असा समज आहे. आसपासच्या समाजातील ज्याला कोणाला दुसèया माणसाचा सूड घ्यायचा आहे असा इसम चेटकिणीकडे जातो. त्याचा वैरी सतत भूतबाधेच्या किंवा काही अघटित घटना घडण्याच्या भीतीने त्रस्त रहावा म्हणून ती त्याला काही कर्मकाण्ड करायला सांगते. ही बातमी सर्वदूर पसरून लोक तिचा दुस्वास करायला लागतात आणि तिचा दराराही वाढतो. तिने आपल्यावर चेटुक करू नये म्हणून तिला पैसे व भेटवस्तू देवून खुष ठेवण्याचा लोक प्रयत्न करू लागतात.

या बाबतीत भगत मात्र पक्के धंदेवाईक असतात. आपल्या अलौकिक मंत्रशक्तीने ते कोणालाही त्रस्त करू शकतात असा दावा करून ते आपल्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करतात. भगत हे गावाचे सल्लागार, मार्गदर्शक आणि वैद्यही असतात. एखाद्याला आपल्या समाजातून हकलून द्यायचे असेल तर भगत व इतर मिळून ते काम करतात. अशी खेडी पोलिसस्टेशनपासून लांब असल्याने पोलिसांना याचा बंदोबस्त करता येत नाही. चेटकीण ठरविल्या जाणाèया स्त्रियांना जाळून टाकले जाण्याच्या भीतीने पोलिसांच्या आश्रयाला जाणे भाग पडते. छोट्या मोठ्या आजारांसाठी आणि त्यावर इलाज न केल्याने मरण ओढवल्यास त्यांना जबाबदार धरले जाते. विवेक आणि सारासार विचार यांच्या अभावी सगळीकडे लोक भीतीने पछाडलेले असतात.

दुष्ट प्रथांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न :  या दुष्ट प्रथा या विभागातून नाहीशा करण्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते मनुष्यबळ आणि इतर साधनांची जुळवाजुळव करीत आहेत. स्थानिक जमातीतील सुशिक्षित तरुणांना या कामासाठी आपल्या खेड्यांमधून अंनिसच्या शाखा उघडण्यास, तत्त्वशून्य कारवायांवर करडी नजर ठेवण्यास प्रोत्साहन देत आहेत. त्याचा चांगला परिणामही दिसायला लागला आहे. अंनिसने शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि गावकरी यांना आपल्या समस्या आणि त्यांचे निराकरण यावर चर्चा करण्यासाठी एका मंचावर एकत्र आणले. अंनिसचे कार्यकर्ते या जमातीतील लोकांना आरोग्य आणि शिक्षणाचं महत्त्व तसेच त्यांच्या दुष्ट प्रथांचं मूळ कारण याविषयी जागरूक करीत आहेत.