वास्तू शास्त्र

भ्रामक शास्त्र: मागील सुमारे १५ वर्षांपासून आपल्याकडील सुशिक्षित बुद्धीजीवींना प्राचीन भारतातील वास्तुशास्त्राची भुऱळ पडली आहे. गेली कित्येक शतके इतिहासामधे गडप झालेलं हे भ्रामक शास्त्र ८० च्या दशकामधे पुन्हा डोकं वर काढू लागलं आहे. इथे महत्त्वाचं हे आही की वास्तुशास्त्र पडद्याआड असतानाच्या कालामधे सुद्धा देशामधे घरबांधणीत व सर्वच बांधकामांमधे प्रगती होतच आहे; ज्ञानविज्ञानामधे झपाट्याने वाढ होत आहे आणि मानवी जीवनशैली आणि जीवनमान सुधारत आहे. वास्तुशास्त्र पडद्याआड राहिल्याने त्यामधे काही खंड पडला नाही.

आता हे शास्त्र आमचं महान प्राचीन परंपरागत विज्ञान म्हणून पुनरुज्जीवित केलं जात आहे. आणि जो जो या शास्त्रानुसार वास्तु बांधतो किंवा त्यानुसार बांधलेल्या वास्तूमधे राहतो त्याला यश, आरोग्य, सुख, समृद्धी सारं काही निश्चित लाभतं असा गवगवा केला जात आहे.

हे शास्त्र पूर्णपणे विज्ञाननिष्ठ आहे हा ह्या शास्त्र्यांचा दावा इथे तपासून पहायचा आहे. विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोनाचं एक महत्त्वाचं तत्त्व आहे, ‘वास्तव ज्ञान आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फतच मिळू शकतं. या तत्त्वानुसार वैज्ञानिक पद्धती हळूहळू निरीक्षण-अन्वेषण-प्रयोग-अनुमान-निष्कर्ष या टप्प्यांमधून सिद्ध होत असते. ज्ञान मिळविण्याची ही सर्वात जास्त विश्वसनीय पद्धती आहे.

या पद्धतीनेच सर्व ज्ञान तपासलं  जातं, त्याची सत्यासत्यता ठरविली जाते आणि नंतर ते विज्ञान बनतं. वास्तुशास्त्रालाही विज्ञान ठरण्यासाठी ह्या कसोटीतून पार पडायला हवं. त्यालाही आपल्या सर्व धारणांमधला व विधानांमधला कार्य-कारण संबंध सिद्ध करावा लागेल. हे काहीही न करता वास्तुशास्त्र संपूर्णपणे वैज्ञानिक आहे असं मानणं आणि त्याचा व्यवहारात उपयोग करण्याचा अट्टाहास ही फसवेगिरी नाही का? विज्ञानाच्या प्रगतीमुळे उपलब्ध होणाèया सर्व गोष्टींचा लाभ घ्यायचा पण विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोन नाकारायचा, ‘आमचं प्राचीन शास्त्र म्हणून विज्ञानाची कसोटी न लावता वास्तुशास्त्राचा अंगिकार करायचा हा दुटप्पीपणा सोडायला हवा. वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवणं ही वैयक्तिक बाब होवू शकेल पण त्याला विज्ञान म्हणणं ही शुद्ध फसवणूक आहे; स्वतःची व इतरांची.

आजच्या जगामधे कोणालाही विज्ञान, त्यामुळे प्राप्त होणाèया सोयी-सुविधा, त्याची विश्वसनीयता नाकारणं अशक्य आहे. ‘वैज्ञानिकङ्क असणं भारदस्त आणि प्रतिष्ठा मिळवून देणारं असतं. म्हणून काहीही खटपटी करून वास्तुशास्त्राला विज्ञानसिद्ध बनविण्याचा खटटोप केला जातो. हे शास्त्र विज्ञानसिद्ध नाही एवढं सिद्ध करणं पुरेस नाही. ते कोणत्या परिस्थितीमधे निर्माण झालं, त्याची वाढ कशी झाली, त्यावेळचा समाज, लोकांचे व्यवहार, उपजीविका ह्या सर्वांचा ऊहापोह व्हायला हवा.

निवारा उभारणं: निवाऱ्याची गरज तर माणसाला सुरुवातीपासूनच जाणवत असणार. माणूस काय जनावरं, पक्षी, कीटक, मुंग्या सर्वच सजिवांना निवाऱ्याची गरज असते. पक्षी घरटी बांधतात; जंगली श्वापदं गुहांचा आसरा घेतात; मुंग्या वारुळ बनवतात. आपापल्या गरजेनुसार प्रत्येक प्राणी निवारा शोधतो किंवा बनवतो. पण हे सारे मानवेतर प्राणी त्यांच्यातील उपजत प्रेरणेनुसार, त्यांच्यातील जन्मजात मज्जायंत्रणेनुसार शतकानुशतके एकाच पद्धतीने निवारा बनवीत आले आहेत. माणूस मात्र बुद्धीचा वापर करून आपल्या निवारा बांधणीत आपल्या गरजांनुसार सतत सुधारणा करीत आला आहे.

निवारा बांधणीच्या सुरुवातीपसूनच त्यामधे सुधारणा करण्यासही सुरुवात झाली. निवारा बांधणीचं वास्तुशास्त्र केवळ भारतातच बनवलं गेलं असं नाही. अशा तऱ्हेचे शास्त्र निर्माण करणं आणि स्थळ-काळ, भौगोलिक परिस्थिती, त्या त्या जागेचे हवामान, तेथील संस्कृती, तिथे उद्रवणाऱ्या आपत्ती इत्यादींच्या मुळे भासणाऱ्या वेगवेगळ्या गरजांनुसार घरबांधणीमधे सतत सुधारणा करीत राहणं, हे जगभर चालूच असतं. इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की आर्यांच्या टोळ्यांनी आक्रमण करून एतद्देशीय संधोक संस्कृती नष्ट केल्यावर हे भारतीय वास्तुशास्त्र निर्माण करण्यात आलं आहे. संधोग संस्कृतीप्रमाणेच इतर अनेक प्रगत संस्कृतींचा अशा रानटी आक्रमक टोळ्यांनी विध्वंस केलेला आहे. अशा आक्रमणांमधून काही मोजक्याच संस्कृती स्वतःला वाचवू शकल्या आहेत.

ऐतिहासिक पैलू: ह्या शास्त्राला विज्ञान म्हणावे का नाही याचा शहानिशा करण्या अगोदर हे निर्माण झालं तो काळ आणि त्या काळी घडलेल्या घटना आणि त्यांचे परिणाम तपासायला हवेत. वास्तुशास्त्राचे प्रवक्ते असं सांगत असतात की हे शास्त्र वेदिक काळात जन्मलं आहे आणि ऋग्वेदामधे ह्याचे काही उल्लेख सापडतात. परंतु त्यापूर्वीच म्हणजे आर्य भारतात येण्यापूर्वीच सिंधू नदीच्या खोèयातले मूळचे रहिवासी उत्तम घरबांधणी करीत असंत. ह्या रहिवाशांवर जम बसवून स्वतःची सत्ता स्थापन करण्यासाठी आर्यांना अनेक क्लुप्त्या योजाव्या लागल्या. त्यातीलच एक आहे वास्तुशास्त्र आणि त्याचं मूळ आहे यज्ञवेदींच्या बांधणीमधे. यज्ञ परंपरा आणि यज्ञाचे विधी जसजसे विस्तृत होत गेले तशी चातुर्वण्र्य पद्धती बळकट होत गेली आणि घरबांधणीला धार्मिक कार्याचं स्वरूप आलंं. इतर धार्मिक कृत्यांप्रमाणे घरं बांधतानाही गूढ शक्तींना शान्त करणे, तृप्त करणे व त्यासाठी कर्मकाण्ड क्रमप्राप्त झाले. या महाशक्ती गण, गुरू, स्थपती, आगत्य, पुरुष इत्यादी नावाने ओळखल्या जातात. यामधे वास्तुपुरुष मंडल आणि वास्तोस्पती या संकल्पनांची भर पडली; शुभ-अशुभ, पितर, वास्तुशास्त्र, ब्रह्म, ईश्वर, स्वर्ग, मोक्ष, आत्मा अशा आणखीही काही संकल्पना यातून निपजल्या.

हे आर्य येण्यापूर्वी सिंधू नदीच्या खोèयामधे अत्यंत काटेकोरपणे नियोजन केलेली महानगरे वसली होती असं अनेक उत्खननांमधून दिसून आलेलं आहे. वास्तुशास्त्रामुळे चातुर्वणीय समाजरचना निर्माण करता आली. आज अस्तित्वात असलेली वर्णजातव्यवस्था पाहता ही दुष्ट व्यवस्था घट्ट मूळ धरून राहण्यामधे वास्तुशासत्राचा फार मोठा वाटा आहे असा निष्कर्ष निघतो.

वेदिक ज्ञान: वास्तुशास्त्राचे कैवारी भृगु ऋषींच्या काही श्लोकांचा आधार घेवून सांगत असतात की वेदिक काळामधे फार प्रगत वास्तुशास्त्र वापरामधे होते; लांब रुंद पक्के रस्ते होते; मोठमोठ्या इमारती होत्या; एवढेच नव्हे तर विमानेही होती. एका संशोधकाने त्यांना एक मोठा मार्मिक प्रश्न विचारला. तो इथे द्यायलाच हवा, ‘मित्रांनो तुम्ही म्हणता त्यानुसार प्रचीन काळीच आपल्याकडे विमाने आणि आज निर्माण होत असलेली शस्त्रास्त्रे होती; ज्या ज्या गोष्टींचे आज शोध लागत आहेत त्या सर्व वेदकाळीच भारतीयांनी शोधून काढल्या होत्या. आजकालचं संशोधन हे आमच्या कडचं पुरातन वेदिक ज्ञान आहे. मग मला हे सांगा की त्यांनी दुचाकीचाही त्याकाळी शोध लावला होता का? आणि ते दुचाक्या वापरीत होते का? इथे प्रश्न असा उद्भवतो की मोहेन्जोदारो, हरप्पा, धोलावीरा इत्यादी ठिकाणी झालेल्या उत्खनांमधून वेदिक काळाअगोदर इथे अस्तित्वात असलेल्या प्रगत सभ्यतांचे अनेक पुरावे उत्खननांमधे सापडतात; परंतु वेदिक सभ्यता अशीच प्रगत होती, त्यांनी विज्ञान आणि तंत्रविज्ञानामधे लक्षणीय प्रगती केली होती याचा एकही पुरावा का मिळत नाही?

वास्तुशास्त्रामधे ज्या आठ दिशा महत्त्वाच्या मानल्या आहेत त्यांच्याशी वाèयाची दिशा, सौरऊर्जा, गुरुत्वाकर्षण अशा काही संज्ञांशी  मिळतेजुळते घेवून एक वैज्ञानिक चौकट  निर्माण केली जाते.याच्या आधाराने गोष्टी आणि क्रिया शुभ आहेत का अशुभ; त्यांच्यामुळे धन व सुखशान्ती लाभेल का हालअपेष्टा भोगाव्या लागतील; त्यातून यश मिळेल का निराशा पदरी पडेल हे ठरविले जाते. परंतु या बाबतीत कोणताही वैज्ञानिक निष्कर्ष अगर पुरावा मिळविण्याची तस्दी मात्र घेण्याची गरज वास्तुशास्त्र विशारदांना भासत नाही.

त्यात भर म्हणून वरील सर्व संकल्पना ईश्वर, स्वर्ग, नरक, मुक्ती अशा कल्पनांशी जोडलेल्या असल्यामुळे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. त्यांना वैज्ञानिक निकष लावण्याची गरजच उरत नाही. आपल्या प्राचीन संस्कृतीचे गोडवे गातांना आपल्याला प्रमाणबद्धता आणि वस्तुनिष्ठता यांचं भानंच राहात नाही. विज्ञानाच्या अनेक शाखा- आयुर्वेद, गणित, धातुशुद्धीकरण, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता (आणि वास्तुशास्त्र सुद्धा)- आपल्या कडे प्राचीन काळी प्रगत झाल्या होत्या. त्यापैकी ज्या शाखांमधे उत्क्रांती होण्याचं थांबलं त्या कालबाह्य ठरल्या. आयुर्वेदासारख्या शाखा नुसत्या जिवंतच राहिल्या नाहीत तर अजूनही प्रगती करीत आहेत. त्यामधे सतत संशोधन होत आहे. वास्तुशास्त्र मात्र २० वर्षांपूर्वीपर्यंत लोकांना माहीतही नव्हतं. त्याचं कारण उघड आहे. कालानुक्रमात लोकांना हे कळून चुकलं होतं की ह्या शास्त्राची आधारतत्त्वे वैज्ञानिक नाहीत. त्यामुळे हे जुने शास्त्र कालबाह्य झाले. त्यानंतर गेल्या काही दशकांमधे ह्या जुन्या शास्त्राच्या कैवार्यांना  ते पुन्हा नव्याने शोधून काढावे लागले आणि त्याला आधुनिक विज्ञानाच्या चौकटीमधे बसवावे लागले.

दिशांचा प्रभाव: वास्तुशास्त्रामधे दिशांच्या प्रभावाचे महत्त्व फार मोठे असते. त्यामुळे हवामानाच्या परिणामांचा अंदाज घेता येतो आणि त्याचा योग्य वापर करता येतो. परंतु आज आपण ज्या वास्तुशास्त्राबाबत चर्चा करीत आहोत त्यामधे व्यावहारिक उपयुक्ततेचा विचार न करता लोकांना धाक व दरारा वटेल अशा गूढ संकल्पना आणि त्यांचा अनादर केल्यास भोगाव्या लागणाऱ्या भयानक परिणामांचाच विचार असतो. मूळ मयमत वास्तुशास्त्र वाचल्यास याचा प्रत्यय येईल. त्यामधे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा किंवा माणसाच्या भविष्यावर त्यामुळे होणाऱ्या परिणामाचा उल्लेखही करीत नाही. सर्वसाधारणपणे वास्तुशास्त्राचे नियम न पाळल्यास काय वाईट परिणाम होतील हे सौम्य शब्दात सांगण्यात येते. अलिकडच्या वास्तुशास्त्रामधे मात्र मुलांचे मृत्यू, दारिद्रय, पूर्ण नायनाट अशा भयानक दुष्परिणामांची दहशत दाखविलेली असते. विज्ञानामधे माणसाच्या वर्ण-जातीला काहीच महत्त्व नसतं. आणि वास्तुशास्त्रात तर तत्त्वांचे उल्लंघन करणाèयास त्याच्या वर्णजातीनुसार वेगवेगळे परिणाम सांगितले आहेत. अशा शास्त्राला विज्ञान कसं म्हणता येईल?

भोंगळ युक्तिवाद:

वास्तुशास्त्रासारखीच इतर भ्रामक शास्त्रे आपली सत्यता सिद्ध करण्यासाठी वैज्ञानिक संज्ञांचा वापर करतात आणि लोकांच्या मनात अनेक गैरसमज रुजवतात. सुशिक्षित बुद्धिजीवीसुद्धा या वैज्ञानिक संज्ञांना भुलतात. आणि मुळात ज्याचा पायाच दोशयुक्त आणि अवैज्ञानिक आहे त्या वास्तुशास्त्राच्या डोलाèयातील त्रुटींकडे दुर्लक्ष करतात. या भ्रामक शास्त्रांचा आधार म्हणजे आठ दिशा. या आठ दिशा नैसर्गिक नसतात; त्या ठरविल्या आहेत माणसाने आपल्या सोयीसाठी. आपल्या पूर्वेकडचा प्रदेश ब्रह्मदेशाच्या पस्चिमेला असतो.

अशा निश्चित नसलेल्या दिशा शुभ किंवा अशुभ, चांगला qकवा वाईट परिणाम घडविणाऱ्या कशा असू शकतील? पृथ्वी स्वतःच्याच अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. एखाद्या प्रचंड चाकावर बसून आपण फिरत असू अशी. ते चक्र फिरत असले की आपल्याला आजूबाजूच्या सर्व गोष्टी फिरताना दिसतात. प्रत्यक्षात फिरत असतो आपण आणि आजूबाजूच्या सर्व गोष्टी स्थिर असतात. तसाच आपल्याला सूर्य पूर्वेला उगवून संपूर्ण पूर्व पश्चिम प्रवास करून पश्चिमेला मावळताना दिसतो. अशा स्थितीत दिशांना शुभाशुभ, लाभदायक वा धोकादायक अशी विशेषणे लावण्यात काय शहाणपण आहे? याहीपेक्षा मजेदार स्थिती आक्र्टिक व अंटार्टिक प्रदेशात जिथे सहा महिने रात्र व सहा महिने दिवस असतो तिथे उद्भवते. २१ मार्च ते २३ सेप्टेंबर या काळामधे चक्क मध्यरात्री आकाशात सूर्य दिसत असतो. इथे वास्तुशास्त्राची महान तत्त्वं कशी लागू करायची? बिचाèया वास्तुशास्त्र्यांना इथे इग्लूसारखे घर बांधावे लागले तर काय काय खटपटी लटपटी कराव्या लागतील!

 वास्तूचे गूढ :

वास्तु म्हणजे नेमके काय? संस्कृतमधल्या या शब्दाचा अर्थ आहे आपण राहतो ती जागा.वास्तुशास्त्र जन्माला आलं त्यावेळेस नगरपालिका नव्हत्या, शहरविकास अधिकारी नव्हते आणि बांधकामाचे कायदेही नव्हते. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर वाताविमुख दिशेला असावं आणि हे अगदी सम्युक्तिक आहे कारण स्वयंपाकघरातील धूर घरात पसरण्याऐवजी वाऱ्याबरोबर बाहेर फेकला जाईल. तेव्हा घराला चिमण्या अगर निष्कासन (हवा बाहेर फेकणारे) पंखे नव्हते. पण आजचे वास्तुपंडित या पुराणकालच्या शहाणपणाचा विपर्यास करतात. कारखान्यांमधे बॉयलर रूम कुठे असावी त्याबाबत ते सल्ला देतात. कारण जसा स्वयंपाकघरात अग्नी असतो तसाच बॉयलर रूममधेही असतो. भारत फोर्ज या कंपनीने बराच पैसा खर्च करून आपल्या प्लँटची संरचना वास्तुशास्त्रतज्ञाच्या सल्ल्यानुसार बदलली. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण वास्तुशास्त्रामधे एका श्लोकामधे तरी कुठे फॅक्टरी आणि बॉयलरचा उल्लेख आहे का? तेव्हा त्या अस्तित्वातच नव्हत्या. आता वस्तुस्थिती बदलल्यावर, धूरविरहित इंधन वापरात आणल्यावर आपण वास्तुशास्त्राच्या या तत्त्वांवर किती विसंबून राहायचं?

वास्तुशास्त्रानुसार एखाद्या जागेचं  प्रवेशद्वार दक्षिण दिशेस असणं अशुभ आहे आणि त्यामुळे सत्यानाश अटळ असतो. एखाद्या व्यापारउदिमाच्या रस्त्यावर जिथे दुतर्फा दुकाने असतात तिथे अध्र्या दुकानांचा प्रवेश दक्षिणेकडूनच होणार. ते सगळेच्या सगळे दुकानदार अपयशी ठरतात का? वॉशिंगटन डी सी येथील व्हाईट हाऊसचं प्रवेशद्वार दक्षिणेला आहे. आणि तेही वास्तुनियमांना न जुमानता एका qभतीच्या मध्यभागी आहे. पण तिथे राहातात अमेरिकेचे आष्ट्राध्यक्ष जे जगातील सर्वात प्रबळ महासत्तेची अध्वर्यू आहेत.

वास्तुशास्त्राच्या काळामधे घराचे दरवाजे आणि खिडक्या वारा नीट खेळण्यासाठी एका सरळ रेशेमधे असणं आवश्यक होतं. एका ग्रंथामधे असं म्हटलं आहे की पस्चिमेकडे छाया देणारी मोठमोठी झाडे असावीत. त्या प्रांतातील पश्चिमेकडच्या प्रखर सूर्यप्रकाशाला आडविण्यासाठी याची गरज आहे हे कोणीही समजू शकेल. पण उत्तर भारतात याची गरज नाही. दक्षिण भारतात सूर्यप्रकाश थोडासा उत्तरेकडून येत असतो. तिथे हा नियम लागू पडतो. वास्तुशास्त्रावरील सर्व ग्रंथ त्या त्या प्रदेशाच्या गरजांनुसार लिहिले गेलेले आहेत. पण आजकाल ते सर्व सर्रास दिल्ली ते कन्याकुमारीपर्यंत सर्व प्रान्तांमधे लागू करण्यात येतात. एका वास्तुशास्त्राने तर असे म्हटले आहे की ब्राह्मणांना घरेच असू नयेत. त्या वेळेच्या सामाजिक संरचनेनुसार ते कदाचित योग्यही असेल; पण आता आपण आंधळेपणाने ते अमलात आणायचे काय?

आजचे वास्तुशास्त्री जी गोष्ट उघड करीत नाहीत (काहींना ती माहीतही नसेल) ती म्हणजे शेकडो वर्षांपूर्वीचं वास्तुशास्त्र एकच नसून त्याची अनेक रूपान्तरे आहेत. अर्थात वास्तुशास्त्रे अनेक आहेत आणि त्यांचे लेखकही वराहमिहीर, भृगू, मनुसार, मयमत असे अनेक अहेत. प्रत्येकाची स्वतंत्र ग्रंथरचना, स्वतंत्र स्पष्टीकरण आणि स्वतःच्या प्रदेशातील हवामान, सामाजिक आचारनियम, उपलब्ध असलेलं साहित्य या सर्वांचा विचार कारून केलेली रचना एकसारखी असणं शक्यच नाही. आणि त्या प्रदेशाच्या दृष्टीने ती योग्यच होती. योग्य वायूविजनासाठी दारं-खिडक्या विशिष्ट दिशेने बांधणं आवश्यक असतं. तेच साधण्यासाठी त्यावेळी योग्य ते नियम बांधले गेले. परंतु आता हे सारं कृत्रिम रीतीने साध्य होवू शकतं आणि घरात वातानुकूलन व्य्वस्था असल्यास वायुविजनाचा प्रश्नच उद्भवत नाही.

पाण्याचा साठा पश्चिमेकडे असल्यास एका वास्तुशास्त्रानुसार दुर्दैव ओढवते. मग मुंबईला तर अरबी समुद्राचा प्रचंड पाण्याचा साठा पश्चिमेला आहे. आणि मुंबई देशाचे व्यापारी केंद्र बनले आणि तिथे एवढी मोठी आर्थिक उलाढाल होते; एवढा प्रचंड महसूल शासनाला तिथून मिळतो हे सर्व काय तिच्या दुर्दैवामुळे? याला आजचे वास्तुपंडित असं उत्तर देतात की मुंबई शहर वसलेलं आहे समुद्रात भर घालून बनविलेल्या जमिनीवर. त्यामुळे वास्तुशास्त्राचे नियम तिथे लागू होत नाहीत. पण संपूर्ण मुंबई काही अशा जमीनीवर वसलेली नाही त्याचे काय?

आपल्याकडचा इतिहास बघूया. प्रसिद्ध मराठा शासक, पेशवे यांनी सुखसमृद्धी लाभावी म्हणून उत्तर दिशेला तोंड असलेले दरवाजे बनविले. पुण्याच्या शनिवारवाड्याचं भव्य प्रवेशद्वारही उत्तर दिशेस आहे. तरी ते कर्जबाजारी झाले आणि संकटांनी ग्रासले. त्या दिवसामधे सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नव्हती. विहिरीचे पाणी सांडपाण्याने दूशीत होवू नये म्हणून नहाणीघर विहीरीपासून लांब असावे असा नियम होता. पण आता परिस्थिती पार वेगळी आहे. जलनिःसारण व्यवस्था तर आहेच पण दहा मजली इमारती,  ओव्हरहेड टँक्स असल्याने सांडपाण्याचा आणि जलस्रोताचा संपर्क अशक्य आहे. या दहाव्या मजल्यावरच्या रहिवाशांना तळमजल्यापासून लांब संडास-नहाणीघरं बांधून द्यावीत काय? या एका मजल्यावर अनेक फ्लॅट्स असलेल्या  इमारतींमधे प्रत्येक मजल्यावर एकाच फ्लॅटचे दार उत्तरेकडे असणार. मग उरलेले सारे फ्लॅट्स काय दुर्दैव ओढवणारे असणार?

आपण जर सारासार विचार करणंच सोडून दिलं तर बरेच विनोद उत्पन्न होवू शकतात. वास्तुशास्त्रावरील एका ग्रंथामधे केवळ पूर्व दिशेला वाहणाèया नद्या त्या प्रदेशाला सुजलां सुफलां बनवू शकतात असे म्हटले आहे. त्याकाळी आणि काही विशिष्ट  प्रदेशामधे अशी वस्तुस्थिती असू शकते. पण हा वैश्विक सर्वसाधारण नियम होऊ शकत नाही. भारतात गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, केरळ ह्या प्रान्तांमधे पूर्वेकडे वाहणाèया नद्या नाहीत. पण सुबत्ता नाही असे म्हणता येणार नाही.

तिरुपतीचे देवस्थान तिथल्या वास्तूमुळे प्रचंड श्रीमंत आहे; इतर देवस्थाने त्यांच्या वास्तूमुळे दरिद्री राहिली आहेत. एवढंच काय देव सुद्धा या वास्तूच्या तावडीतून सुटू शकत नाहीत. तुम्ही पूर्वेकडून प्रवेश केलात तर तुम्हाला शांती लाभेल पण पश्चिमेकडून प्रवेश केलात तर मात्र शांती मिळणार नाही. पण कित्येक देवळे सर्वोभद्र असतात. म्हणजे त्यामधे सर्व बाजूंनी प्रवेश करता येतो. अशा ठिकाणी आपल्याला शांती आणि अशांती दोन्हीही एकाच वेळी लाभेल का? का पूर्वेकडून आंत येणाèयास शांती आणि पश्चिमेकडून येणाऱ्यास अशांती मिळेल.

आणखी एक प्रश्न पडतो; हे वास्तूचं  प्रेम अलिकडेच एवढं उफाळून का आलं आहे? हा प्रश्न आहे सांस्कृतिक आणि सामाजिक स्वरुपाचा. त्याची चार कारणं  असावीत, ती अशी. आपल्या साध्या अपयशांचं खापर या वास्तुवर फोडता येतं. अनेक लोक एका रात्रीमधे श्रीमंत होवून जातात. आणि मग एखाद्या वास्तुपंडिताला पापक्षालन करण्यासाठी, मिळालेल्या संपत्तीतील लाच देवालाही देण्यासाठी बोलावून घेतात. तोही तत्परतेने त्यांची हाक ऐकतो. या अंधश्रद्धा कधी कधी माहामारी सारख्या पसरतात. एखादा मंत्री अशाच काही कारणासाठी वास्तुशास्त्र्याला भेट देतो आणि बाकीच्या मेंढ्या त्याच्यापाठोपाठ त्या शास्त्र्याकडे चक्कर टाकू लागतात.

‘‘ह्या सर्वाचा दुष्परिणाम घरबांधणी करणाऱ्या व्यावसायिकांना भोगावा लागतो. आधुनिक वास्तुविशारद वेगवेगळ्या ५० विषयांचा पाच वर्षे कसून अभ्यास करतात. आणि एवढ्या मेहनतीनंतर मिळालेलं ज्ञान वास्तुशास्त्री क्षणात खोडून काढतात. त्यातील बहुतेकांना स्तंभ (कॉलम), छावणी (qलटेल) आणि तुळई (बीम) यातील फरकसुद्धा माहीत नसतो. तरी सुद्धा संपूर्ण बांधकाम, एवढंच नव्हे तर संपूर्ण शहराच्या रचनेबाबतही ते बिनधास्तपणे सल्ले देत असतात आणि लोक त्यांचं ऐकतात! माझ्याकडे माझे अनेक आर्किटेक्टचे विद्यार्थी केविलवाणेपणे येतात; त्यांच्या व्यवसायामधे हे वास्तुशास्त्री कसा अडथळा आणतात त्याची तक्रार घेवून. घरबांधणीचे व्यवस्थित काटेकोर आराखडे बनविल्यावर आणि त्याला प्राधिकरणाची व सरकारी अधिकाऱ्यांची अनुमती मिळवून झाल्यावर आमचे ग्राहक एखाद्या वास्तुशास्त्र्याला घेवून येतात; हा शास्त्री आम्हाला भलभलत्या, घर विद्रुप करणाऱ्या आणि धोकादायक सुधारणा सुचवतो. हे सर्व बदल करणं त्या ग्राहकाच्याही हिताचं नसतं.

‘‘एका वास्तुशास्त्र्याने देवेगौडांना सांगितलं, ‘तुमच्या घराच्या आत जाण्यासाठी दोनच पायऱ्या असल्याने ते पुरी पाच वर्षे सत्तेत राहणार नाहीत. घर तर बांधून झालेलं होतं; मग आर्किटेक्टने एक युक्ती काढली. प्रवेषद्वाराजवळ जमीनीवर एक उथळ खड्डा केला आणि तिथे फरशी घालून नावापुरती एक जास्तीची पायरी बनविली! तिसरी पायरी झाल्याने सर्वच खुश. पण या तिसऱ्या पायरीलाही देवेगौडांना पाच वर्षे सत्तेत ठेवता आले नाही. एन टी रामरावांना सल्ला देण्यात आला होता की त्यांच्या सेक्रेटरिएटच्या उत्तरेस काही मीटर रुंदीचा एक मोकळा पॅसेज असायला हवा. तिथे तर झोपडपट्टी होती. मग काही करोड रुपये खर्च करून झोपडपट्टी हटविण्यात आली आणि आणखी अशीच मोठी रक्कम खर्चून रामरावांसाठी उत्तरदिशेला भव्य प्रवेशद्वार बनविण्यात आलं. पण दुर्दैव पहा. लवकरच त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यात आलं आणि अवघ्या सात महिन्यानंतर ते स्वर्गवासी झाले. वास्तुशास्त्रानुसार बदल घडविण्यात जनतेचा करोडोंचा पैसा मंत्री आपल्या लहरीनुसार खर्च करतात त्याविरुद्ध कोर्टामधे जनहितयाचिका दाखल करायला हव्यात.

‘‘दुर्दैवाची गोष्ट ही की या वास्तुशास्त्र्यांवर कोणतेही नियंत्रण नाही; त्यांना कोणतेही कायदे लागू होत नाहीत. त्यांची ही कृत्ये ग्राहकसंरक्षण कायद्याखाली आणायला हवीत. वर्तमानपत्रे, टीव्ही आणि इतर माध्यमांनी सजग राहून अशा भंपकशास्त्र्यांसोबत परस्परांची प्रशंसा करणं थांबवावं. त्यांचा वास्तुसम्राट, वास्तुशिरोमणी, वास्तुप्रविण असल्या उपाधी लावून गौरव करू नये. वास्तुशास्त्राच्या मूळ ग्रंथांमधे असं म्हटलं आहे की भोंदू लोकांनी हा व्यवसाय केल्यास त्यांना कडक शिक्षा व्हावी. याबाबत वास्तुपंडितांचं काय म्हणणं आहे?

‘‘ख्रिस्टोफर रेन या शिल्पविशारदाने एक चर्च बांधलं त्याच्या आत एकही खांब नव्हता. ते चर्च कोसळेल अशी सर्वांना भीती वाटत होती पण ख्रिस्टोफरने खात्री दिली होती की ते अगदी भक्कम असल्याने ते शंभर वर्षे टिकेल. लोकांच्या मनातली भीती घालविण्यासाठी अखेरीस त्यामधे एक खांब उभारण्यात आला. पण हा खांब छतापर्यंत पोचतच नव्हता सहा इंच मुद्दामच खाली ठेवला होता! त्यातून छताला नव्हे तर लोकांच्या मानसिकतेला आधार मिळाला होता.

‘‘ आणखी एक दुएदैवाची गोष्ट ही की आता ख्रिश्चन आणि मुस्लिम बांधवही या भ्रामक शास्त्राच्या विळख्यात सापडत आहेत. या प्रलयकारी लाटेच्या विरुद्ध मी लढत आहे. यामधे मला स्वयंसेवकांची मदत हवी आहे. याबाबतीत ‘मेडिकल रेमेडीज अॅक्ट १९१०ङ्क सारखा वास्तुशास्त्राच्या व्यवसायासाठी हवा. वास्तुशास्त्रींनी त्यावर आपलं मत लिखित स्वरूपामधे कळवावं. या विषयातील अंधश्रद्धांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी समिती बांधायला हवी.

आर व्ही कोल्ह्टकर

(डेक्कन हेराल्डच्या सौजन्याने)

घरबांधणीबाबत स्तिमित करणाèया सूचना:

नहाणीघर पूर्वेकडे असावं आणि हिटर, स्विचबोर्ड अग्नेयेकडे. असं का? कारण अग्नेय म्हणजे अग्नी. म्हणून जेजे उष्णता देतं ते अग्नेयेस.

तुमचा प्लॉट जर इंग्रजी एलच्या आकाराचा असेल तर तुम्हाला मुलीच होतील. हे कसं शक्य आहे? उत्तर सोपं आहे. या विशिष्ट आकाराच्या प्लॉटमधे शुक्र जंतु केवळ स्त्रीगर्भ निर्माण करू शकतात.

प्लॉटचे मुख्य फाटक पूर्वेस अगर उत्तरेस असेल तर घरमालकाला समृद्धी लाभेल. पण त्याच वेळेस लेकुरे उदंड होतील. तुम्ही ऑपरेशन करून बंदोबस्त केलेला असला तरी! विज्ञानाची ऐशीतैशी.

स्वयंपाकाचा ओटा पूर्व किंवा अग्नेय दिशेऐवजी दुसऱ्या कोणत्या दिशेस असेल तर घरातील स्त्रीला डोकेदुखी, पाठदुखी आणि मासिक स्त्रावाचे दुखणे जडेल.

शौचालय पश्चिमेस असावे. कारण इंग्रजी वेस्ट म्हणजे पश्चिम तसेच त्याच उच्चाराच्या दुसऱ्या शब्दाचा अर्थ टाकावू , निरुपयोगी!

शस्त्र क्रिया करताना शस्त्रविशारदांनी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करावे. शरीराच्या कोणत्याही भागावर शस्त्रक्रिया असली तरीसुद्धा.

या सर्व सूचना आणि त्यांची कारणे वास्तुशास्त्रींनी दिलेली आहेत. कोणतेही निरीक्षण/प्रयोग किंवा आकडेशास्त्र यावर आधारलेले पुरावे न देता ही सर्व विधाने विज्ञानसिद्ध आहेत असा त्यांचा दावा असतो.

या असल्या विचित्र सूचना कशासाठी देण्यात येतात? कशासाठी? तुमच्याच निरोगी, संपन्न व सुखी आयुष्यासाठी. आज या सूचना विचित्र वाटतात. काही दशकांपूर्वीपर्यंत अशक्य वाटत असलेली उद्दिष्टे साध्य करण्यात आज माणूस यशस्वी झाला आहे. अनेक धोकादायक प्रक्रिया आता यंत्रांच्या सहाय्याने करता येतात. वैद्यक शास्त्रात, बायोएंजिनिअरिंगमधे, संपर्क-दळणवळण, वाहतूक यामधे झालेल्या प्रगतीमुळे माणसाचं जीवन सुकर होत आहे. आणि या सर्व सुविधांचा फायदा सारे वास्तुशास्त्री आणि त्यांचे अनुयायी सामान्य माणसांपेक्षासुद्धा थोडा जास्तच उठवत असणार.त्यातून त्यांचं जीवन निरोगी होत असणार आणि वास्तुशास्त्रामुळे संपन्न आणि परिणामी ऐशोआरामाचेही.

वास्तुशास्त्र सिद्धान्ताच्या गाभ्यातच विसंगत आणि हास्यास्पद विधाने आहेत. आणि आजच्या वास्तवात त्यांचं  स्पष्टीकरण करण्याचं आणि उपयुक्तता सांगण्याचं काम वास्तुशास्त्रींच्या वैयक्तिक आकलन व निर्णय शक्तीवर अवलंबून असल्याने वास्तुशास्त्र्यांमधेच मतभेद असणारच. त्याची आधुनिक वास्तुशिल्पशास्त्राशी (आर्किटेक्चर) तुलनाच होवू शकत नाही.

उपयुक्तता, सुरक्षा, संरक्षण, आरोग्य, भक्कमपणा, देखणेपणा आणि खर्च या सर्व गोष्टींचा आधुनिक आर्किटेक्चरमधे सखोल विचार केला जातो. त्याउलट वास्तुशास्त्राची सर्व मदार असते परंपरागत श्रुती-स्मृती-पुराणोक्त मान्यतांवर. आणि त्या वास्तूमधे राहणाऱ्यांचे भविष्य ठरविण्याचा दावा वास्तुशास्त्र करते.

आधुनिक आर्किटेक्चर आणि प्राचीन वास्तुशास्त्र यांच्या धारणांमधे फार तफावत आहे. आर्किटेक्चर मुलांसाठी सोयीचे असेल पण तुमची जननक्षमता वाढवू अगर कमी करू शकणार नाही. त्यामधे आगप्रतिबंधक सोयी असतील पण तुमच्या घराला आग लावणाèया शत्रूंचा द्वेश शमवू शकणार नाही. वास्तुशास्त्राप्रमाणे भौतिकतेच्या कक्षेबाहेर जावून देव-दानव, शत्रू यांच्या कारवायांचं नियंत्रण करणार नाही. ह्या भ्रामक कल्पना सोडून अलिकडे वास्तुशास्त्री त्यांच्या शास्त्राला गूढ संकल्पनांऐवजी वैज्ञानिक संज्ञा वापरून पेश करण्याचा प्रयत्न करतात.

तुमचं नशीब बदलता येत नाही असं  मानलं जातं. त्यामुळे वास्तुशास्त्रीय युक्तिवादात विरोधाभास दिसतो. अंगठी, रत्न निवडणं तसंच वास्तुशास्त्राचा अंगिकार करणं यामुळे नशीब उघडलं की नाही हे ठरवायचं तरी कसं? नशीब उघडलं तर शास्त्र खरं आणि नाही उघडलं तर शास्त्र खोटं नाही तर तिसरंच काहीतरी कारण असल्याचं सांगतात. शास्त्र कधीच खोटं ठरविता येत नाही. शिवाय हे वास्तुशास्त्र तसं महागडंच असतं फक्त श्रीमंत मंडळींना परवडतं. शहरी भागातील फ्लॅटमधे राहणाèया मध्यम वर्गाला ते परवडत नाही. आणि वास्तुशास्त्राचा अंगिकार करून मिळतं काय? केवळ मानसिक समाधान, भविष्यात काही चांगलं घडेल याची आशा. पण त्याची किमत मोजावी लागते घर कमकुवत करून आणि दैववादी कमकुवत मानसिकता जोपासून.

वास्तुशास्त्री अनेक खर्चिक, अवैज्ञानिक, निरुपयोगी आणि कधीकधी घातक अशा सूचनाही करीत असतात. कधी बांधकामात फार जड वस्तू वापरून वा एखादाच भाग उंच केल्याने  धरणीकंप झाल्यास होणारं नुकसान वाढतं; खर्च वाढतो; वास्तुशास्त्रींची बिदागीही काही लहानशी नसते; घराला कुरूपपणा येतो; घरातील जागेचा योग्य वापरही होत नाही आणि विनाकारण अडथळे येतात. कधी कधी तर संपूर्ण बांधकाम पाडून टाकून नव्याने वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात येते. असा वेळ, साधनं, कष्ट, संपत्ती यांचा अपव्यय करणं हा गुन्हा आहे.

आपल्याकडचं दारिद्रय नष्ट करायला वास्तुशास्त्र अंगिकारणं हा एक नामी उपाय ठरू शकेल. त्याचं असं आहे, आपल्याकडच्या गरीब जनतेला एखादीच खोली घर म्हणून मिळू शकते. त्यांना फक्त त्याच खोलीमधे वास्तुशास्त्री सांगतील त्या दिशेला आणि त्या जागी आपलं स्वयंपाकघर, बैठकीची खोली, शयनघर इत्यादी हलविण्याची तसदी घ्यावी लागेल. तेवढं केलं की बस. त्यातही त्यांना प्रवेश जर उत्तरेकडून होण्याची सोय असेल तर मग काय? सारेच अगदी मालामाल. वास्तुशास्त्रानुसार २१व्या शतकातील प्रवेश सुद्धा उत्तरेकडून अगर पूर्वेकडूनच केला गेला पाहिजे!

कोणतीही सेवा घेणाèया ग्राहकांना ते जे दाम मोजतात त्यानुसार सेवा मिळण्याचा हक्क आहे. पण वास्तुशास्त्रींची सेवा मात्र अशी आहे की पैशाच्या मोबदल्यात काय मिळेल याची खात्रीच नाही. आर्थिक नुकसान आणि फसविले गेलो ही भावना हे तर अगदी उघड दिसणारे दुष्परिणाम आहेत. पण या तोट्यांबरोबर दैववादी बनून तुम्ही स्वतःच्या मनाला आणखीनच कमकुवत बनवता हे त्यापेक्षाही वाईट!

पृथ्वितलावर पहिली वास्तु कशी सिद्ध झाली याबद्दल एक खास भारतीय पौराणिक कथा समरांगणसूत्र या वास्तुशास्त्रावरील प्राचीन ग्रंथामधे दिलेली आहे. ती अशी. एकदा सर्व मानव स्वर्गामधे गेले; तिथे त्यांनी देवदेवतांसोबत आणि वृक्षवेलींसोबत खूप मजा केली. या अनुभवाने त्यांना नशा चढली. म्हणून त्यांना देवांनी पृथ्वीवर ढकलून दिले. पण त्या धूर्त मानवांनी खाली पडतापडता स्वर्गातील शाली तंडूल नावाचं झाड आपल्याबरोबर पृथ्वीवर आणलं. आणि इथे त्याची लागवड केली. या झाडाने एवढी फळे दिली की माणसांनी ती यथेच्छ खावून त्यांचा मोठा साठाही बनवून ठेवला. पण त्यातून लोभीपणा, संताप, मद, मत्सर, आळस हे माणसाचे षड्रिपू उफाळून आले. मग सर्व फळांचा चक्काचूर झाला आणि माणसं अशक्त झाली. त्यांना संरक्षणाची गरज भासू लागली. म्हणून त्यांनी त्याच स्वर्गातून आणलेल्या झाडाच्या फांद्यांपासून निवारा बनविला. हेच ते माणसाचं सर्वप्रथम बांधलेलं घर आणि वास्तुशास्त्राचं मूळ! वास्तुशास्त्रामधे भृंगराज नावाच्या देवाला आणि रुद्राला मनुष्यबळी देण्याचं एक मोठं महत्त्वाचं आणि अनिवार्य कर्मकाण्ड दिलेलं आहे. वास्तुशास्त्रांच्या आधुनिक संस्करणामधे या प्रथेचा नामोल्लेखही नसतो.

सुदैवाने माणूस या प्राथमिक घरबांधणीशीच थांबला नाही. त्याने आपल्या निवाऱ्यामध्ये सतत सुधारणा करणं चालूच ठेवलं. विविध प्रदेश, तेथील हवामान, संकृती, तिथे उद्भवणाèया नैसर्गिक आपत्ती अशा अनेक घटकांशी जुळवून घेत घेत जगभरातील माणसाने घरबांधणीमधे प्रचंड प्रगती केली. भारतातील वास्तुशास्त्राबाबत आपण एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायला हवी. ती म्हणजे सिंधू खोऱ्यातील मूळच्या रहिवाशांवर केलेलं आक्रमण आणि त्यांच्या संस्कृतीचा विनाश. ठिकठिकाणी अशी आक्रमणं आणि संस्कृतीचा विनाश रानटी आक्रमक टोळ्या करीत आल्याने अनेक प्राचीन संस्कृती नष्ट झाल्या. आणि त्यातील अगदी निवडक संस्कृती आज तग धरून आहेत.

समरांगण वास्तुशास्त्राप्रमाणे दक्षिण भारतात मयमत आणि उत्तर भारतात विश्वकर्मा प्रकाश असे आणखी दोन वास्तुशास्त्रावरचे प्राचीन ग्रंथ उपलब्ध आहेत. आणखीही काही आहेत. या तीन शास्त्रांमधे त्यातील मूळ तत्त्वांबाबत तरी एकवाक्यता आहे का? दुर्दैवाने कोणत्याही तत्त्वाबाबत त्यांच्यात एकवाक्यता नाही. दिशांचे परिणाम, देवदेवतांची स्थाने, इत्यादी सर्व महत्त्वाच्या मुद्यांबाबत त्यांच्यामधे मतभेद आहेत. धर्म,जात, राष्ट्र यावरून या ग्रंथांमधे असलेल्या कोणत्याही आवड/नावड, गैरसमज किंवा पूर्वग्रह असल्या गोष्टी विज्ञानाला मान्य नाहीत.

तरीही मानवाच्या निरीक्षण, निरीक्षणावरून गृहीतक रचणं, त्याचा प्राप्त परिस्थितीशी संबंध जोडणं,  त्यामधे गरज पडेल तसे बदल करणं आणि त्याचं एक सुसूत्र आणि बिनचूक शास्त्र बनविणं या उपजत प्रवृत्ती या ग्रंथांच्या बाबतीतही कार्यरत असाव्यात. उदा: मयमत वास्तुशास्त्र दक्षिण भारतामधे-आजच्या केरळमधे- रचलं गेलं. हा प्रदेश दक्षिणेला आणि पश्चिमेला समुद्राने वेढलेला आहे. तेव्हा मयमतच्या लेखकाला प्रगती पूर्व आणि उत्तर दिशेलाच होवू शकते असं वाटणं अगदी संयुक्तिक आहे. त्याउलट उत्तर भारतातले विश्वकर्मा त्या देशाचा उत्तर आणि पूर्व भाग हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगानी व्यापला असल्याने प्रगती पश्चिम आणि दक्षिणेकडेच होवू शकते हे जाणत होते. मयमताच्या लेखकाने त्या प्रदेशाचे हवामान पश्चिम दिशा ठरविते हे जाणून यम या देवतेची पूजा करण्यास सांगितले. तेव्हा अशी होती प्राचीन अप्रगत अवस्थेतील वास्तुशास्त्राची पूर्वपीठिका. हे शास्त्र काळाच्या ओघामधे पूर्णपणे मानवाच्या विस्मृतीमधे गेलं होतं.

अगदी अलिकडे मात्र त्याचे एका भ्रामक वैज्ञानिक रूपामधे पुनरुथ्थान करण्यात आलेलं आहे. त्यातून लोकांची दिशाभूल होते आणि समाजमनामधे गोंधळ माजतो. हे कालबाह्य शास्त्र विज्ञानच आहे हे सिद्ध करण्यासाठी ह्यामधे भरपूर वैज्ञानिक संज्ञा वापरून लोकांची दिशाभूल केली जाते. व्ही. गणपती हे वास्तुशास्त्री सांगत असतात की वास्तुशास्त्रामधे ‘व्ही आर एफ‘ हे वैज्ञानिक तत्त्व उपयोगात आणले जाते. (व्ही-व्हायब्रेशन-म्हणजे कंपन; आर-रिदम म्हणजे लय आणि एफ-फॉर्म-म्हणजे आकार.) विश्व एक सहा चौरस बाजू असलेलं प्रचंड घन आहे. त्यामधे नाद आणि कंपनं उत्पन्न होत असल्याने त्याला घनगोलाचा आकार येतो. हेच मानव आणि विश्व यांच्या अद्वैताचे तत्त्व. आणि असंच बरंच काही; अगदी अनाकलनीय. याला सुशिक्षित माणसं सुद्धा भुलतात आणि त्यातील त्रुटी नजरांदाज करतात. या अशाच दोषयुक्त पायावर वास्तुशास्त्र उभारले आहे हे ते विसरतात.

लार्सेन अॅण्ड टुब्रोसारख्या मोठमोठ्या औद्योगिक कंपन्या, लिन्टास एन्टरप्रायझेस ही अॅडव्हरटायझिंग कंपनी, ईझेल पेqजग कंपनी, नॉइडा येथे असलेली झी कंपनी, विक्रम इस्पात, बिर्ला ग्रुपच्या इमारती अशा अनंत कंपन्या आपल्या वास्तूंमधे ह्या कालबाह्य वास्तुशास्त्रानुसार मोठे बदल करून घेत आहेत. ह्यापैकी काही यशस्वी ठरल्या तर काही अयशस्वी. ह्या भंपक शास्त्रावर अवलंबून राहाणं म्हणजे बौद्धिक जाड्य आहे. हा बौद्धिक आळस झटकून विवेकपूर्ण विचार करण्याऐवजी त्याला ‘आपल्या महान प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणंङ्क, ‘अगणित पिढ्यांचं शहाणपणङ्क अशी गोंडस नावं दिली जातात. आजच्या धावपळीच्या जगामधल्या चिंता , दूरीभवन, चंगळवाद, वैफल्य, भ्रष्टाचार, गुन्हेगारी इत्यादी, प्रचंड वेगाने होणाऱ्या आधुनिकीकरणामुळे सतत वाढणाऱ्या अडचणी हा बौद्धिक आळस झपाट्याने लोकांमधे पसरवीत आहेत.