आमच्या विषयी

चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन
सस्नेह नमस्कार,
एका बाजूला विज्ञानाची प्रगती आणि दुसऱ्या बाजूला अनेक अंधश्रद्धांना कवटाळून जगणारा समाज, हे दृश्य आज आपण सर्वत्र पाहत आहोत. खऱ्या अर्थानं जर समाज विकसित व्हावा असे आपणास वाटत असेल तर तो समाज अंधाश्राद्धांपासून मुक्तच असावा याबाबत आपल्या कोणाच्या मनात शंका नाही. म्हणून या क्षेत्रात गेले २६ वर्ष अखंडपणे कार्यरत चळवळ म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती. म्हणजे समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतरही संघटनेचे कार्य त्याच जोमाने आणि दुप्पट वेगाने सुरु आहे. आपले या सामाजप्रबोधनाच्या चळवळीत मन:पूर्वक स्वागत आहे. संत, समाजसुधारक आणि पुरोगामी विचारवंतांची मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाली त्यांचे विचार आजही समाजाला मार्गदर्शक आहेत, याच विचारांसाठी संघटना सक्रीय आहे. आपणही या कामात साथ द्यावी.

चळवळीची वैचारिक भूमिका
समाजातील अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्यासाठी चळवळीने आपली चतु:सूत्री निश्चित केली आहे.

१. शोषण करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध.

२. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणे.

३. धर्माची विधायक, कठोर आणि कृतिशील चिकित्सा करणे.

४. परिवर्तनवादी भूमिका घेऊन काम करणाऱ्या अन्य चळवळींना साथ-सहयोग.

संघटना कोणत्याही प्रकारच्या देव आणि धर्माच्या विरोधात नाही तर तटस्थ आहे, त्याच्या नावाने होणारे शोषण, फसवणूक थांबावी अशी भूमिका आहे. देव आणि धर्म मानण्याचा, अथवा नाकारण्याचा आपल्याला देशाच्या संविधानाने दिलेल्या अधिकाराचा समिती सन्मान करते.

महाराष्ट्र अंनिस ने आपल्या भविष्यातील कामांची दिशा निश्चित केली आहे ती पुढीलप्रमाणे

– अध्यात्मिक बुवाबाजी आणि फसव्या विज्ञानाच्या आधारे केल्या जाणाऱ्या बुवाबाजीशी संघर्ष

– मानसमित्र प्रकल्पाद्वारे ‘निरामय मानस अभियान’

– जातिअंतासाठी ‘जोडीदाराची विवेकी निवड’ आणि ‘जातपंचायतीला मुठमाती’

– भारतीय संविधानातील मूल्ये समाजात रुजविण्यासाठी ‘संविधान बांधिलकी अभियान’’

संघटना संत आणि समाजसुधारकांचा वारसा चालवू इच्छिते.या संवादाचा मार्ग हा अहिंसात्मक व सनदशीरच असणार याबाबत समितीची ठाम भूमिका आहे.समिती कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करीत नाही. भारतीय संविधानाची मूल्ये समितीच्या वैचारिक भूमिकेला पुरक आणि मार्गदर्शक वाटतात.हे समितीचे वैचारिक सूत्र आहे. हे मान्य असलेल्या कोणतीही व्यक्ती समितीची कार्यकर्ती होऊ शकते.त्यांचे स्वागत.या कामासोबत आपलाच विकास होत जातो.आपले विचार तल्लख बनतात,आपण अधिक चांगले नागरिक म्हणून समाजात अधिक जबाबदारीने वागतो.म्हणजे खऱ्या अर्थाने आपला व्यक्तिमत्व विकास होतो.