वैज्ञानिक मनोवृत्ती

विज्ञान हेच असं एकमेव अस्त्र आहे जे आपल्या इथल्याभूक आणि दारिद्रय, अस्वच्छता आणि निरक्षरता, अंधश्रद्धा आणि जुनाट रूढीपरंपरा , वाया जाणारी प्रचंड साधनसंपत्ती आणि या समृद्ध देशातील उपासमार अशा सर्व समस्यांवर तोडगा काढू शकेल. आजच्या जगामधे विज्ञानाकडे दुर्लक्ष करणं कोणाला शक्य होईल? प्रत्येक गोष्टीमधे विज्ञानाची मदत आपल्याला घ्यावी लागते. यापुढे विज्ञानाला आणि विज्ञानाच्या मित्रांनाच केवळ भविष्य आहे.

                                                                                                                                                      जवाहरलाल नेहरू

देशाचे पहिले द्रष्टे पंतप्रधान, नेहरू यांच्या या संस्मरणीय उक्तीला पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला असला तरी आजही ह्या सात लाख खेडी आणि पाडे असलेल्या समृद्ध देशामधे हरितक्रान्तीमुळे प्रत्यक्ष भूकबळी नसले तरी, ज्यांच्या गळ्याभोवती अंधश्रद्धा आणि जीवघेण्या परंपरा-रूढींचे दोरखंड आवळलेले आहेत अशाच लोकांची वस्ती जास्त आहे. ही दोरखंडे तोडून टाकल्याशिवाय नेहरूजींचं विज्ञानाशी मैत्री करण्याचं स्वप्न साकार होणार नाही तर विज्ञान केवळ काही अभिजनांच्या हातातलं खेळणं आणि शोषणाचं साधन बनून राहील.

समाजामधे  वैज्ञानिक चित्तवृत्ती जोपासणे हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रचारापेक्षा बरंच काही जास्त आहे: वैज्ञानिक चित्तवृत्ती (सायंटिफिक टेंपर) म्हणजे केवळ ज्ञानवृद्धीसाठी आवशक असलेली माहिती आणि तथ्ये जाणणं नव्हे qकवा विवेक बुद्धी वाढवणारा विवेकवादही नव्हे. त्यामधे बरंच आणखी काही आहे. वैज्ञानिक चित्तवृत्ती हा एक मनाचा कल आहे ज्याच्यामुळे व्यक्तीचा एक विशिष्ट दृष्टिकोन आणि वागणुकीची पद्धत निश्चित होते. असा कल एखाद्या वंश-धर्म-देशापुरता मर्यादित नसून तो वैश्विक आहे. हा कल एक प्रभावी नैतिक मूल्य म्हणून आपल्या समाजाच्या सर्व थरांमधून झिरपला आणि मुरला पाहिजे; कारण आपण कसा विचार करतो, आपल्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक समस्यांना कसे सामोरे जातो या सर्व प्रक्रियांवर वैज्ञानिक चित्तवृत्तीचा मोठा प्रभाव पडतो.

वैज्ञानिक चित्तवृत्तीमधे मान्य केलेल्या  आधारविधानांपैकी महत्त्वाची विधाने अशी (प्रमिसेस) आहेत:

* विज्ञानाची पद्धती ही ज्ञानसंपादनाची एक विश्वासार्ह पद्धती आहे.

* या पद्धतीनुसार मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग करून अनेक मानवी समस्यांचं आकलन आणि उकल करता येते.

* वैज्ञानिक पद्धती माणसाच्या दैनंदिन जीवनामधे आणि नैतिकता ते राजकारण आणि अर्थकारण या सर्व क्षेत्रातील मानवी प्रयत्नांमधे पूर्णपणे उपयोगात आणली गेली पाहिजे तरच मनुष्य जातीचा निभाव लागेल; या भूतलावर मानव टिकू शकेल.

* वैज्ञानिक पद्धतीद्वारा संपादन केलेले ज्ञान हे त्या वेळेस माहीत असलेल्या सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जावू शकते हे सर्वांनी मान्य केले पाहिजे. ह्या ज्ञानाशी विसंगत असलेल्या ज्ञानाबाबत शंका उपस्थित केली पाहिजे तसेच तत्कालीन ज्ञानाचे पुन्हा पुन्हा परीक्षण करीत राहिले पाहिजे.

वैज्ञानिक पद्धती म्हणजे माहिती गोळा करून, त्यावर प्रक्रिया करणे; त्यातून मानवी स्वभाव, मानवाचे नैसर्गिक आणि सामाजिक वातावरण यांचं सुव्यवस्थित आकलन होईल असे अर्थपूर्ण आकृतीबंध (पॅटर्न्स) शोधणे. अशी ही पुनर्जननात्मक (रीजनरेटिव्ह) प्रक्रिया आहे. या अर्थाने संक्रामक (कम्यूनिकेबल) मानवी ज्ञानाचे सर्व पैलू  वैज्ञानिक पद्धतीच्या कवेत येतात आणि भौतिक विज्ञान, सामाजिक विज्ञान, उपयोजित विज्ञान अशा तऱ्हेचे विज्ञानाचे कृत्रिम कोष्ठीकरण (कंपार्टमेन्टलायझेशन) ज्ञानसंपादनाच्या आड येवू शकत नाही.

हे सर्व ध्यानात घेवून अंनिस वैज्ञानिक प्रवृत्तीचा विशेषतः ग्रामीण भागात प्रसार करण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवते. समाजाच्या सर्व स्तरांमधे वैज्ञानिक प्रवृत्ती रुजविणं आणि जोपासणं हे अंनिसचे स्वप्न आहे.

आकाश निरीक्षण

माध्यमांमुळे शहरातील काही लोक थोडेफार जाणकार झालेले आहेत. पण त्यांच्यातही विविध प्रकारच्या ‘हाय टेक्  अंधश्रद्धा दिसतातच. खेड्यांमधे अजूनही अंधश्रद्धांच्यामुळे कितीतरी पैसे अनाठायी खर्चले जातात. खेड्यातील या लोकांना आणि विशेषतः मुलांना विज्ञानाच्या मूळ तत्त्वांची जाण करून द्यायलाच हवी जेणेकरून हा वायफळ खर्च करण्यापासून ते परावृत्त होतील. प्राधान्याने अनुसूचित जाती, जमाती आणि स्त्रिया यांनी बनलेल्या ह्या खेड्यातील समाजामधे विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबतची जाण वाढावी म्हणून खूप जास्त प्रयत्न करायला हवेत.

ग्रामीण केंद्रस्थान: ग्रामीण भागामधे प्रयत्नांची शिकस्त करायला हवी हे लक्षात घेवून, तेथील जनतेच्या भावना न दुखावता, व्याख्यानं-प्रात्यक्षिकं इत्यादी शांततेच्या मार्गाने लोकांच्या मनामधे घट्ट रुजलेल्या अंधश्रद्धांचं निर्मूलन करण्यावर अंनिसने लक्ष केंद्रित केले. ग्रामीण भागातील काही सुजाण नागरिक अन्निसच्या या प्रयत्नांचं स्वागत करतात आणि आपली हलाखीची स्थिती आणि परंपरागत जीवनशैली असून सुद्धा अंनिसच्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देतात. काही छोटीमोठी शहरं सोडली तर महाराष्ट्र अजूनही वैज्ञानिक मनोवृत्तीच्या बाबतीत मागासच म्हणायला हवा. आदिवासी भागात तर अजूनही चेटुक आणि नरबळीच्या प्रथेवर लोकांचा विश्वास आहे. खेड्यावर/पाड्यावर काहीही संकट ओढवलं तर खेड्यातीलच एखाद्या स्त्रीला चेटकीण म्हणून लक्ष्य केलं जातं. ह्या सर्व गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत आणि त्यासाठी फारसा खर्चही करावा लागणार नाही पण स्वयंसेवी संस्थांनी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करण्याची मात्र नितांत आवश्यकता आहे.

फलज्योतिष, राशीचक्र, ग्रहांच्या गतीवर अवलंबून असलेल्या शुभ वेळ, दैव इत्यादी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी सर्वात जास्त परिणामकारक असलेले साधन म्हणजे आकाशदर्शन. परंतु ते केवळ एका टेलीस्कोपच्या सहाय्याने साध्य करता येणार नाही हे विज्ञानबोधवाहिनीचा कार्यक्रम राबवितांना लक्षात आले. वैज्ञानिक मनोवृत्तीचा पायाच मुळात विश्वाची उत्पत्ती आणि स्वरूप, विश्वशास्त्र, खगोलशास्त्र इत्यादींच्या प्राथमिक ज्ञानावर आधारित आहे. ह्याचे गरजेपुरते ज्ञान देण्यास तारांगणासारख्या साधनाची अंनिसला गरज भासली. या बाबतीत अंनिसने आयुकाशी संबंध साधला आणि त्यांच्याकडे असलेले तारांगण काही काळासाठी घेवून त्याची उपयुक्तता किती आहे याचा अंदाज औरंगाबाद येथील एका कार्यक्रमामधे घेतला. हा कार्यक्रम खूपच परिणामकारक व लोकप्रिय ठरला.

ह्या अनुभवामुळे अंनिसने एका वाहनामधे फिरते नभांगण घेवून ८वी आणि ९वी च्या दररोज २०० विद्याथ्र्यांसाठी जागोजागी आकाशदर्शनाचे कार्यक्रम राबविण्याची दोन वर्षांची योजना आखली. कलकत्त्याच्या नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम या संस्थेने असे फिरते तारांगण बनविले आहे. त्यांच्याकडे या योजनेचा प्रस्ताव पाठविला आहे. हे तारांगण मिळायला अजून बराच अवधी लागेल. मधल्या काळात अंनिसने आयुकाकडून तारांगण घेवून आपले ग्रमीण व शहरी भागातील आकाशदर्शनाचे कार्यक्रम सुरू ठेवले आहेत.

आकाशदर्शन योजनेची कार्यवाही: ह्या योजनेमधे आसपासच्या ग्रामीण विभागाचं प्रमुख केंद्र असलेल्या एका शाळेमधे एक फुगविण्याजोगे (इन्फ्लेटेबल) तारांगण ठेवायचे. या शाळेने आसपासच्या शाळांशी संपर्क साधून तेथून काही विद्यार्थी प्रदर्शन पाहण्यास बोलवायचे. एका वेळेस प्रत्येक वर्गातील २० विद्याथ्र्यांसाठी ३० मिनिटांचे प्रात्यक्षिक दाखविले जाईल. शाळेच्या वेळात ह्या कार्यक्रमासाठी विद्याथ्र्यांना हजर राहता यावे यासाठी संबधित शिक्षण अधिकाèयांची परवानगी घेण्यात येईल. अशा तऱ्हेने प्रत्येक दिवशी पाच तासांमधे २०० विद्याथ्र्यांना तारांगण पाहण्याची संधी मिळेल. प्रात्यक्षिकाच्या अगोदर व नंतरच्या कालावधीत विद्याथ्र्यांना पोस्टर्सचे प्रदर्शन, प्रश्नमंजुशा, आणि वक्तृत्व स्पर्धा अशा मनोरंजक व उद्बोधक कार्यक्रमामधे भाग घेण्याची संधी मिळेल. यातून विश्वाबाबतची बरीच माहिती ते मिळवू शकतील. प्रशिक्षित निवेदक तारांगणाच्या आतील घटकांची माहिती देतील. प्रात्यक्षिकामधे खगोलशास्त्र आणि विश्वशास्त्र, ग्रहताऱ्यांची  स्थिती आणि त्याचा माणसाच्या दैनंदिन जीवनाशी काही संदर्भ आहे का याचे स्पष्टीकरण दिले जाईल.

विज्ञान बोध वाहिनी

अंनिसची अशी खात्री आहे की अज्ञानामुळे लोक अविवेकीपणाने वागतात आणि अंधश्रद्धा बाळगतात. त्यांना योग्य शिक्षण मिळालेलंच नसतं. शाळा-कॉलेजांमधून विज्ञानाचं शिक्षण घेतल्यावर लोक सुबुद्ध होतील आणि त्यांच्यात वैज्ञानिक मनोवृत्ती रुजेल आणि ते वैज्ञानिक, विवेकी आणि तर्कशुद्ध दृष्टीकोनातून आपल्या आयुश्याकडे पाहतील अशी आशा आपण बाळगली होती. परंतु देशाचं शैक्षणिक धोरण ठरीवणाऱ्यानी शिक्षणसंस्थांच्या कार्यामधे खीळ घातली आणि यामधे ज्यांचे हितसंबंधा गुंतलेले आहेत अशा शिक्षणतज्ञांनी आपली जनता प्रतिगामी बुरसट विचारांमधेच रुतलेली राहील अशी व्यवस्था केली. आपल्या देशात  फार उच्च दरजाचे समजले गेलेले पंडित केवळ इथले लोक ठेंगूच राहिले आहेत म्हणून  उंच दिसतात.

जातीव्यवस्थेमधे बहुजनांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेल्याने ते अडाणीच राहिले. लिहायला-वाचायला शिकणं म्हणजे पाप आहे असं त्यांच्या मनावर ठसवलं गेलं. अशा तऱ्हेने बहुजनांना शेकडो वर्षे दूर ठेवणाèया या स्वार्थी उच्च वर्णियांमुळे बहुसंख्य भारतीय दरिद्री अवस्थेला पोचलेले आहेत. सुमारे ४०० वर्षांपूर्वी युरोपमधे झालेल्या ‘पुनरुज्जीवनङ्क चळवळीमुळे झालेल्या सामाजिक उत्थानात लोकांच्या विचार करण्याची पद्धतच बदलून गेली; विज्ञान आणि तंत्रविज्ञानामधे नवनवीन शोध लागले; सगळं जगंच बदलून गेल; आधुनिक जीवनशैली प्रचलित झाली. परंतु या उलथापालथीमधे आपण कुठेच नव्हतो. बहुजनांना अडाणी ठेवणारी समाजाची परिस्थिती अशीच राहिली तर लवकरच आपण जगातील सर्वात मागास देश बनू. काही मूठभर श्रीमंत लोकांनी धर्म, शिक्षण, जमीनमालकी, व्यापार एवढंच नव्हे तर शासनाधिकार सुद्धा आपल्याच मुठीत ठेवले आणि स्वतः गब्बर झाले तर देश समृद्ध होत नाही. गरीबी हटाव म्हणून गरीब लोक नाहीसे करता येणार नाहीत. देशाची अनावस्था दूर होण्यासाठी, देश समृद्ध बनण्यासाठी बहुजन सुशिक्षित आणि विवेकी होणं आवश्यक आहे. संविधानामधल्या आदेशानुसार बहुजनांमधेही वैज्ञानिक मनोवृत्ती, जिज्ञासा आणि मानववाद जोपासला पाहिजे. हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे.

हे कर्तव्य अंनिस कसोशीने बजावत असते. पण हे कार्य बहुव्यापी आणि परिणामकारक होण्यासाठी – सुशिक्षित/अशिक्षित साèया समाज घटकांमधे वैज्ञानिक मनोवृत्ती आणि दृष्तिकोन जोपासण्यासाठी- अंनिसला चांगली उपकरणे आणि प्रभावी साधनांची नितांत गरज आहे. या बाबतीत देशातील बहुसंख्यांचं अज्ञान नाहीसं करण्यासाठी एका जागी कायम स्वरुपाचं शैक्षणिक केंद्र उभरण्याऐवजी दूरवरच्या खेड्यापाड्यांमधे सुद्धा पोचू शकेल असं एक फिरतं युनिट बनवावं असं अंनिसने विचाराअंती ठरवलं. असं युनिट जिथे गरीब व अशिक्षित लोक राहतात, जिथे शिक्षणाची काहीच सोय नसते अशा ठिकाणी पोचू शकेल. यातून विज्ञानबोधवाहिनीची संकल्पना साकारली. हे खास वाहन निर्माण करण्यासाठी अमेरिका आणि जपान या देशातील ‘रोटरी क्लब‘च्या शाखांनी मदत केली. हे वाहन म्हणजे एक चाकं असलेला ‘विज्ञानाचा वर्ग‘ आहे. शहरातील झोपडपट्ट्या आणि दूरवरच्या खेड्यापाड्यातील बाल-तरूण-वृद्ध या सर्वांपर्यंत हा विज्ञान वर्ग पोचतो.

वाहिनीमधे असलेल्या गोष्टी: १. एक पुस्तकसंग्रहालय. त्यामधे प्राथमिक विज्ञान, पर्यावरण, आरोग्य आणि अंधश्रद्धानिर्मूलन यांवरील पुस्तकं आणि पोस्टर्स आहेत. २. दूरदर्शक दुर्बीण (टेलिस्कोप). ३. विज्ञान, अंधश्रद्धा विरोधी मते इत्यादींच्या ऑडियो आणि व्हिडियो सीडीज . ४. ही उपकरणं वापरण्यासाठी लागणारी साधनं-सीडी प्लेअर, अँप्लिफायर, लाउडस्पीकर, मायक्रोफोन इत्यादी. ५. व्हीडियोची साधनं-व्हिडियो सीडी/डीव्हीडी प्लेयर, व्हिडियो प्रोजेक्टर, पडदा इत्यादी.

कार्यक्रमांची कार्यवाही: विज्ञानबोधवाहीनीच्या दौऱ्यातील कार्यक्रमांचे नियोजन बऱ्याच आधी केले जाते. या कार्यक्रमांमधे ज्यांना रस आहे अशा शाळांशी व शेड्यांशी संपर्क साधला जातो. ठरलेल्या दिवशी अंनिसचे कार्यकर्ते त्यात्या ठिकाणी जातात. प्रात्यक्षिके, पोस्टर्सचे प्रदर्शन, टेलिस्कोप हाताळण्याचा अनुभव, फिल्म शो, चमत्कारांच्या प्रात्यक्षिकांसमवेत स्पष्टीकरणाचं वक्तव्य इत्यादी माध्यमांमधून अंनिसचे कार्यकर्ते अंधश्रद्धा विरोधी संदेश लोकांपर्यंत पोचवून वैज्ञानिक मनोवृत्ती जोपासतात.