महिलांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा जाहीरनामा

जाहीरनाम्याचा उद्देश: आपल्या देशामधे स्त्रियाच अंधश्रद्धेच्या सर्वात जास्त बळी ठरतात. आणि त्याच वेळी त्या अंधश्रद्धा पसरविणाचं कामही करीत असतात. ही गोष्ट सर्वानीच लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे स्त्रियांची ही मानसिक गुलामगिरी नाहीशी करता येईल. या बाबतीत एक ठोस उपक्रम आखता यावा म्हणून अंनिस अंधश्रद्धा निर्मूलनाच्या जाहीरनाम्याचा मसूदा तयार करून तो संबंधितांकडे पाठवीत आहे.

विचारार्ह मुद्दे:

 स्त्रियांच्या मनातल्या अंधश्रद्धा फार खोलवर रुजलेल्या असतात. त्याची कारणं अनेक आहेत. पुरुषांपेक्षा त्यांना बऱ्याच जास्त आपत्ती आणि अडचणी, पराजय आणि निराशा यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे त्यांच्या मनामधे अगतिकतेची भावना फार जास्त असते. आणि त्यामुळे त्या जास्त अंधश्रद्ध असतात.

आपला समाज पुरुषप्रधान आहे हे दुसरं  कारण. एक चांगला नवरा आणि मुलगा असणं हेच स्त्रीच्या जीवनाचं सार्थक असतं. जगातील सर्वच धर्मांनी स्त्रियांना दुय्यम दर्जा दिलेला आहे. हजारो वर्षे त्यांना ज्ञानार्जन व शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. विषमतेचे हे धार्मिक संस्कार स्त्रियांच्या मनामधे इतके खोलवर रुजले आहेत की त्या हे सारं नैसर्गिक समजतात आणि धर्माने रुजविलेली ही विषमता आणि दुय्यम स्थान यांच्यामधेच त्या स्वतःला आसरा आणि आधार शोधतात. सर्व कालबाह्य परंपरा, चालीरीती आणि कर्मकांडे त्यामधे तसूभरही फरक न करता त्या आजही कसोशीने पार पाडतात. शिक्षणाचा अभाव, नोकरी-धंदा किंवा इतर काही कमाईचं साधन नसणं, लैंगिक छळ सोसावा लागणं, पुरुषांच्या बरोबरीने कामकरून त्याच कामाचा पुरुषांपेक्षा मोबदला कमी मिळणं, मालमत्तेमधे हक्क नसणं आणि जाहिरातींमधे भोगवस्तू असल्यागत स्त्रीचं चित्रण होणं ह्या सर्व गोष्टी स्त्रीच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवितात. त्यामुळे ती अंधश्रद्धांच्या गर्तेमधे ढकलली जाते आणि आपल्या भोगांना मुकाट्याने सहन करू लागते.

यामधे योग्य तो बदल घडविण्यासाठी मार्गदर्शक सूचना:

१. स्त्रियांचं शिक्षण: त्यांना लिहिणे, वाचणे आणि थोडेफार अंकगणीत एवढेच जुजबी शिक्षण न देता त्या स्वतंत्र विचार करू शकतील एवढ शिक्षण द्या.

२.  सर्व घटनांमागचा कार्यकारण संबंध समजणं आणि शोधणं याची सवय स्त्रियांना लागली पाहिजे; असे झाल्यास त्या प्रत्येक रीत, प्रत्येक परंपरा, प्रत्येक कर्मकांड तपासू लागतील आणि त्यातले आपल्याला काय हवे आणि काय नको हे स्वतःच ठरवून नको असलेल्या गोष्टींचा निर्भीडपणे त्याग करतील.

३.  स्त्री-पुरूष विषमता नाहिशी करण्यासाठी प्रथम स्त्रियांनी स्वतःला कमी लेखणं बंद करायला हवं. आणि आपल्या बुद्धीची कुवत आणि स्वतःमधे असलेल्या इतर क्षमतांचा जास्तीत जास्त विकास करायला हवा.

४.  घराघरातून मुलगा आणि मुलगी यांना एकसारखी वागणूक मिळायला हवी. त्यामुळे मुलांच्या मनामधे उत्पन्न होणारा अहंगंड आणि मुलींच्या मनातील न्यूनगंड होण्याचे टळेल.

५.  काही विशिष्ट समारंभामधे स्त्रिया अपवित्र असतात असे मानून त्यांना भाग घेवू दिला जात नाही. असे सण आणि समारंभ साजरे करण्याचे तत्काळ बंद केले पाहिजे.

६.  स्त्रियांना त्यांची एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र ओळख असावी. स्त्री कोणाची तरी पत्नी, मुलगी qकवा अशीच काही परावलंबी व्यक्ती म्हणून ओळखली जावू नये.

७.  स्त्रिया कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची जेवढी काळजी घेतात तेवढी काळजी त्यांनी स्वतःच्या प्रकृतीचीही घेतलीच पाहिजे. घरातील स्त्री आणि इतर कुटुंबीय या सर्वानाच योग्य आहार, स्वच्छता, वेळच्याचेळी प्रतिबंधक लस व गरज असतील ती औषधे तसेच पुरेशी विश्रान्ती याची नितांत गरज असते.

८.  आपल्याला किती मुले असावीत हे तिच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक क्षमतेनुसार ठरविण्याचा हक्क केवळ स्त्रीलाच असला पाहिजे. या बाबतीत तिच्यावर कोणतेही बाह्य दडपण आणण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा प्रतिकार तिला करता आला पाहिजे.

९.  स्त्रियांनी सर्व संकटांना खचून न जाता धीराने तोंड द्यायला शिकावे. कोणत्याही तांत्रिक-मांत्रिक वा आध्यात्मिक बुवा-मातांच्या खोट्या आश्वासनांना भुलून त्यांना शरण जावू नये.

१०. आपण सर्वांनीच अंधश्रद्धा पसरविणाèयांचा निषेध केला पाहिज. तसेच वृत्तपत्रे, टीव्ही, सिनेमा इत्यादी माध्यमांद्वारा केला जाणारा स्त्रीच्या प्रतिमेचा, तिचा अवमान करणारा उपयोगाचाही निषेध केला पाहिजे. असा निषेध कोणीही व्यक्तिशः सुद्धा करू शकतो हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

११. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुले लहान असतानाच त्यांच्यामधे वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची नितांत गरज आहे. त्यातूनच त्यांचा विवेक आणि विधायक वृत्ती पोसली जाईल आणि ते निर्भय आणि धैर्यवान समाजाचे सभासद बनतील. अशा समाजात शोषणाला थारा राहणार नाही.